Star Pravah Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर या महिन्यात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बाई तुझा आशीर्वाद’ आणि ‘आनंदी’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. यापैकी ‘आनंदी’ मालिका सुरुवातीला आठ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित होणार होती. पण, आता लॉन्च आधीच या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

‘आनंदी’ मालिका ३० मार्चपासून रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे यांची ‘तुझ्या सोबतीने’ मालिका ऑन एअर होते. मात्र, आता ३० तारखेपासून एतशाची मालिका रात्री १० वाजता प्रसारित केली जाईल.

तर, अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका ३० मार्चपासून सायंकाळी साडेसहा (६:३० ) वाजता प्रसारित केली जाणार आहे. खरंतर, ही मालिका डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता अवघ्या तीन महिन्यात या मालिकेची दुसऱ्यांदा वेळ बदलण्यात आली आहे.

स्टार प्रवाहवर ३० मार्चपासून काय बदल होणार?

नवीन मालिका

  • बाई तुझा आशीर्वाद – रात्री ९ वाजता
  • आनंदी – रात्री ९:३० वाजता

नव्या वेळेत

  • तुझ्या सोबतीने – रात्री १० वाजता
  • वचन दिले तू मला – सायंकाळी ६:३० वाजता

‘वचन दिले तू मला’ मालिकेची वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “काय सुरूये हे…चांगला ट्रॅक सुरू आहे आणि वेळ बदलली”, “हे बरोबर नाही…”, “स्टार प्रवाह स्लॉटच्या बाबतीत असं का करतं?”, “अवघ्या ३-४ महिन्यांत वेळ बदलता त्या मालिकेला सेट तरी होऊ द्या”, “असं करू नका चांगली मालिका आहे”, “आता साडेसहा मग दुपारी सुद्धा शिफ्ट करतील” अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

star pravah time slot
‘वचन दिले तू मला’ मालिकेची वेळ बदलल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, आता ३० मार्चपासून सुरू होणाऱ्या नव्या मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.