Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या ३० मार्चपासून ‘आनंदी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेला प्राइम स्लॉट मिळाला असून ‘आनंदी’ रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे ही नवीन मालिका सुरू झाल्यावर स्टार प्रवाहवर काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

‘आनंदी’ ही नवीकोरी मालिका ३० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रात्री आठ वाजता अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रसारित केली जाते. ही मालिका दर आठवड्यात चांगला टीआरपी आणतेय. ‘ठरलं तर मग’ पाठोपाठ ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असते. या लोकप्रिय मालिकेची दुसऱ्यांदा वेळ बदलली जाणार आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ सुरुवातीला रात्री साडेदहा वाजता प्रसारित केली जायची. यानंतर मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता मितवाला रात्री ८ वाजताचा प्राइम स्लॉट देण्यात आला. यानंतर आता ३० मार्चपासून अर्णव-ईश्वरीची मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या साडेसात वाजता ‘स्टार प्रवाह’वर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. ही सिरियल २ महिन्यांपूर्वीच जानेवारी महिन्यात ऑन एअर झाली होती. पण, आता ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे.

३० मार्चपासून ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाईल. आता साडेसहाला प्रक्षेपित होणाऱ्या ‘साधी माणसं’ मालिकेचं काय होणार याबाबत ‘स्टार प्रवाह’ने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. ‘साधी माणसं’ मालिकेची एकतर वेळ बदलतील किंवा ही मालिका ऑफ एअर होण्याची दाट शक्यता आहे.

‘या’ मालिकांच्या वेळेत ३० मार्चपासून बदल

  • ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ – संध्याकाळी ६:३० वाजता
  • ‘तू ही रे माझा मितवा’ – संध्याकाळी ७:३० वाजता

आनंदी ( नवीन मालिका ) – रात्री ८ वाजता

दरम्यान, आता ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या दोन्ही मालिकांना ३० मार्चनंतर किती टीआरपी मिळणार आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदी या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.