Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख अद्याप ‘स्टार प्रवाह’ने जाहीर केलेली नाही. मात्र, मधुराणी प्रभुलकर आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका ५ जानेवारीपासून सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित होईल याची अधिकृत घोषणा ‘स्टार प्रवाह’कडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली.

‘स्टार प्रवाह’वर सध्या साडेसातच्या स्लॉटला रेश्मा शिंदेची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेला टीआरपी देखील चांगला मिळत आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ सिरियल ऑफ एअर होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते.

मात्र, आता जानकी-हृषिकेशने स्वत: आपल्या मालिकेची नवीन वेळ कोणती असेल याबाबत सर्वांना माहिती दिली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नव्या वेळेनुसार रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. रेश्मा व सुमीत म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके जानकी-हृषिकेश याबद्दल सांगतात, “नवीन वर्ष…नवीन वेळ! ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही तुमची आवडती मालिका आता ५ जानेवारीपासून नव्या वेळेत पाहायला मिळेल. दररोज रात्री १०:३० वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवर!”

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ बदलली असताना दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रेक्षकांना पडला आहे तो म्हणजे सध्या साडेदहाच्या स्लॉटला यश-कावेरीची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका सुरू आहे…त्याचं काय होणार? अनेकांनी ही मालिका आता ऑफ एअर होईल असा अंदाज कमेंट्स व्यक्त केला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी आता पुन्हा ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेची वेळ बदलली जाईल असं म्हटलं आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका सुरुवातीला रात्री ८ वाजता प्रसारित केली जायची. यानंतर ‘तू ही रे माझा मितवा’ला आठ वाजताचा प्राइम स्लॉट देऊन ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ रात्री ११ वाजता प्रसारित होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा या मालिकेची वेळ बदलून रात्री १०:३० करण्यात आली. आता जर या मालिकेची वेळ पुन्हा बदलली तर, हा बदल तिसऱ्यांदा केला जाईल.

आता प्रत्यक्षात ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका संपणार की याची वेळ बदलणार याबद्दल लवकरच अधिकृतपणे चॅनेलकडून माहिती दिली जाईल.