Tharala Tar Mag Serial Time Change : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १६ फेब्रुवारीपासून मोठा बदल करण्यात येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका आता पाऊण तास प्रसारित केली जाणार आहे. तसेच मालिकेची साडेआठची वेळ सुद्धा बदलण्यात आली आहे. स्टार प्रवाहवर सोमवारपासून नेमका काय बदल होणार आहे हे जाणून घेऊयात…

छोट्या पडद्यावरील आघाडीच्या वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नऊ वाजताच्या प्राइम स्लॉटला आदिनाथ कोठारेची ‘नशीबवान’ मालिका प्रसारित केली जात होती. पण, आता या मालिकेला दुपारच्या स्लॉटला शिफ्ट करण्यात आलं आहे. १६ फेब्रुवारीपासून ‘नशीबवान’ मालिका दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जाईल.

आता ‘नशीबवान’ मालिका दुपारी प्रसारित होणार आहे म्हटल्यावर, रात्री नऊच्या प्राइम स्लॉटला कोणती मालिका दाखवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या वेळेत आता ‘ठरलं तर मग’ मालिका प्रसारित केली जाईल. सोमवार ते शुक्रवार अर्जुन-सायलीची ‘ठरलं तर मग’ मालिका रात्री ८:४५ ते ९:३० या वेळेत प्रसारित केली जाईल. तर, शनिवारी-रविवारी मालिकेची वेळ नेहमीची रात्री ८:३० ते ९ ही असेल.

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका १६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते ८.४५ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. ‘ठरलं तर मग’प्रमाणे अर्णव-ईश्वरीची मालिका सुद्धा शनिवार-रविवारी नेहमीच्या वेळेत ऑन एअर होईल.

महिन्याभरात वेळ बदलली

‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका रात्री १० वाजताच्या स्लॉटला प्रसारित केली जायची. पण, आता १६ फेब्रुवारीपासून ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका रात्री ९:३० वाजता ऑन एअर होईल.

आता ‘तुझ्या सोबतीने’ मालिका साडेनऊला प्रसारित होणार असल्याने रात्री १० वाजताच्या स्लॉटला ‘वचन दिले तू मला’ ही मालिका शिफ्ट करतील अशी दाट शक्यता आहे.

स्टार प्रवाहच्या मालिका नव्या वेळेत

  • तू ही रे माझा मितवा – ८:०० ते ८:४५ ( सोम-शुक्र ) आणि ८ ते ८:३० ( शनि-रवि)
  • ठरलं तर मग – ८:४५ ते ९:३० ( सोम-शुक्र ) आणि ८:३० ते ९:०० ( शनि-रवि)
  • नशीबवान – दुपारी २:३० वाजता
  • तुझ्या सोबतीने – रात्री ९:३० वाजता
  • वचन दिले तू मला – रात्री १० वाजता प्रसारित होण्याची शक्यता

दरम्यान, आता जवळपास पाच मालिकांच्या वेळेत बदल केल्याचा टीआरपीवर काय परिणाम होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. याशिवाय येत्या काही दिवसांच स्टार प्रवाहवर रात्री नऊ वाजताच्या स्लॉटला कोणती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.