Star Pravah Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका ५ जानेवारीपासून ७:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामुळे रेश्मा शिंदेच्या मालिकेची वेळ बदलून १०:३० वाजताची करण्यात आली आहे. सध्या रात्री साडेदहा वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका प्रसारित केली जात आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ बदलणार असल्याचं जाहीर केल्यावर ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेचं काय होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आणि मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टनुसार ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या निमित्ताने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम गिरीजा-मंदारची जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकली होती. प्रेक्षकांचे लाडके गौरी-जयदीप ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेच्या माध्यमातून यश-कावेरी झाले.

सुरुवातीला ही मालिका रात्री ८ वाजताच्या प्राइम टाइमला प्रसारित करण्यात यायची. पण, कालांतराने या मालिकेची वेळ बदलून रात्री ११ वाजताची करण्यात आली. काही दिवस ११ वाजता ऑन एअर झाल्यावर ही मालिका काही दिवसांतच पुन्हा १०:३० वाजता प्रसारित होऊ लागली. अवघ्या ८ महिन्यांत या मालिकेची वेळ दोन वेळा बदलण्यात आली होती आणि आता ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. नुकताच सेटवर शेवटचा दिवस साजरा करण्यात आला आणि कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

kon hotis tu kau zalis ti off air
कोण होतीस तू काय झालीस तू मालिका संपणार, गिरीजाची पोस्ट

दरम्यान, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेत गिरीजा प्रभू, मंदार जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि या लोकप्रिय जोडीसह सुकन्या मोने, साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, अमृता माळवदकर, वैभव मांगले असे बरेच कलाकार या मालिकेत झळकले. आता ५ जानेवारीपासून रात्री १०:३० वाजता रेश्मा शिंदे व सुमीत पुसावळे यांची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रसारित केली जाईल.