Aata Hou De Dhingaana 3: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या दमदार सूत्रसंचालनाने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमाला आणखी रंगदार केलं आहे. या कार्यक्रमात दोन टीममध्ये सांगीतिक लढत होतं असते. ही सांगीतिक लढत कोणत्या मालिकेची टीम जिंकणार? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. या आठवड्यात होळी विशेष भाग असणार आहे. ज्यामध्ये ‘स्टार प्रवाह’च्या नायिका व खलनायिकांमध्ये सांगीतिक लढत होणार आहे. याचे प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘आता होऊ दे धिंगाणा’. ऑगस्ट २०२२मध्ये या भन्नाट कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिद्धार्थ जाधवने आपल्या जबरदस्त सूत्रसंचालनाने ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम चांगला गाजतो. सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व सुरू आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या होळी विशेष भागात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ , ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मुरांबा’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकांमधील नायिका व खलनायिका पाहायला मिळणार आहे. याच होळी विशेष भागाच्या एका प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडिया पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नायिका व खलनायिका रॅपर झालेल्या पाहायला मिळत आहे. नायिका व खलनायिकांमध्ये रॅपची जुगलबंदी प्रोमोमध्ये होताना दिसत आहे. ही जुगलबंदी कोण जिंकतंय? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, याआधी ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाच्या मंचावर नायिका व खलनायिकांमधील भांडणाचा प्रोमो व्हायरल झाला होता. घंटा घरातून समृद्धी केळकर हंड्यातील पैसे बघून आणत असल्याचा आरोप खलनायिकांनी लावला आहे. यावरून नायिका व खलनायिकांमध्ये वादाची ठिणगी पेटलेली पाहायला मिळाली. त्यामुळे या वादात नेमकं काय होतंय? हे जाणून घेण्यासाठी ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा ( Aata Hou De Dhingaana 3 ) आगामी भाग पाहणं गरजेचं आहे. शनिवारी रात्री ९ वाजता आणि रविवारी रात्री १०.३० वाजता हा होळी विशेष भाग प्रसारित होणार आहे.