Star Pravah Kajalmaya Serial Off Air : टेलिव्हिजन मालिकांमध्ये सध्या टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘काजळमाया’ ही थ्रिलर मालिका सुरू झाली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका सुरुवातीला रात्री साडेदहाच्या स्लॉटला प्रसारित केली जायची. मात्र, टीआरपी पाहून अवघ्या एक महिन्यात ‘काजळमाया’ची वेळ बदलून रात्री अकराची करण्यात आली.

रात्री ११ वाजताच्या स्लॉटला सुद्धा ‘काजळमाया’ला म्हणावा तसा टीआरपी मिळत नव्हता. यामुळेच वाहिनीने या मालिकेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यांत ही मालिका ऑफ एअर होणार आहे. स्टार प्रवाहने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

‘काजळमाया’ मालिकेचा अंतिम भाग ११ जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे. ‘काजळमाया’ या मालिकेत प्रेक्षकांना चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या ‘पर्णिका’ नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळाली. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू असते. अखेर पर्णिका आणि कनकदत्ताचा कायमचा अंत होणार आहे…असं कॅप्शन देत ‘स्टार प्रवाह’ने या अंतिम भागाची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. दोन महिन्यांत मालिका संपणार हे पाहून नेटकऱ्यांना सुद्धा धक्का बसला आहे.

“ही मालिका का बंद केली”, “आता कुठे आम्ही ही मालिका बघत होतो”, “हे कलाकार बिग बॉसमध्ये येणारेत का?”, “चालू कधी झाली कधी संपली काहीच समजलं नाही” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

star pravah serial off air
प्रेक्षकांच्या कमेंट्स

स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका

‘स्टार प्रवाह’वर येत्या १९ जानेवारीपासून नवीन मालिका सुरू होणार आहे जिचं नाव ‘तुझ्या सोबतीने’. यामध्ये एतशा, अजिंक्य ननावरे आणि माधवी निमकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही मालिका ९ वाजताच्या स्लॉटला सुरू होईल. आता ‘काजळमाया’ ऑफ एअर होत असल्याने सध्या नऊच्या स्लॉटला सुरू असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलली जाईल असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. लवकरच याबाबत सुद्धा अधिकृत माहिती ‘स्टार प्रवाह’कडून शेअर केली जाईल.