Star Pravah Serial Laxmichya Pavlani : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मात्र, स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत आता लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट येणार आहे. या वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अद्वैत-कलाच्या जोडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. पण, आता या शोमध्ये एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. कारण, कलाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा केसकरने या मालिकेतून निरोप घेतल्याचं नव्या प्रोमोतून स्पष्ट झालं आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कला-अद्वैतचा लग्नसोहळा सुरू होता. मात्र, यादरम्यान कलाचा अपघात होतो. खरंतर, हा अपघात घडवून आणलेला असतो आणि यात अद्वैतची पत्नी आपला जीव गमावणार आहे. आपली ‘खरे’ आपल्याला सोडून गेली हे दु:ख अद्वैतसाठी खूप मोठं आहे. यामुळे तो आबांबरोबर मंदिरात जाण्यासही नकार देतो. असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत ६ महिन्यांचा लीप आलेला आहे.

अद्वैत मंदिरात जात नाही पण, बाहेर त्याची भेट सुकन्याशी होते. आपल्याला हृदय देऊन ज्यांनी आपले प्राण वाचवले त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेणार, त्यांचे आभार मानणार अशी प्रार्थना सुकन्या देवाकडे करत असते. अर्थातच कलाच्या हृदयामुळे तिला नवीन जीवनदान मिळालेलं आहे. यामुळे कलाची मालिकेतून एक्झिट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा हा विशेष भाग २४ आणि २५ नोव्हेंबरला रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. पण, या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी काहिशी नाराजी दर्शवली आहे.

“कलाला जिवंत का नाही ठेवलं? तिचा पुनर्जन्म दाखवायचा ना…मिस यू कला आम्ही हे स्वीकारू नाही शकत”, “आम्ही कलामुळे मालिका पाहायचो”, “हे काय केलं…वाईट ट्विस्ट”, “कला पाहिजे स्टार प्रवाह टीम प्लीज”, “मालिका बंद करायची यापेक्षा”, “कला नाहीये काय बघणार ही मालिका”, “नवीन अभिनेत्रीला शुभेच्छा पण कलाशिवाय मजा येणार नाही” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

star pravah laxmichya pavalani
प्रेक्षकांच्या कमेंट्स

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये सुकन्या पाटील ही भूमिका साकारण्यासाठी एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर. नक्षत्रा जवळपास ४ वर्षांनंतर ती मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.