मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील आघाडीची नायिका ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली. आता काव्या पाठोपाठ ‘स्टार प्रवाह’च्या आणखी एका नायिकेचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. तिच्या केळवणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या लोकप्रिय नायिकेचं नाव आहे अनुष्का सरकटे. सध्या अनुष्का स्टार प्रवाहच्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत ऊर्जा ही प्रमुख भूमिका साकारत आहे. अनुष्काने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आता अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. अनुष्का लोकप्रिय अभिनेता ‘लागिरं झालं जी’ फेम लोकप्रिय अभिनेता निखिल चव्हाणशी लग्न करतेय. काही दिवसांपूर्वीच अनुष्का आणि निखिल यांच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला होता. आता अनुष्का-निखिलचं केळवण थाटात पार पडलं आहे.
अनुष्का-निखिलच्या केळवणासाठी खास तयारी करण्यात आली होती. केळीच्या पानावर ‘निखिल-अनुष्काचं केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं. याशिवाय हॉटेलमध्ये सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. या जोडप्यासाठी चविष्ट जेवणाचा बेत करण्यात आला होता. तसेच अनुष्का व निखिलला खास आमरस सुद्धा सर्व्ह केला होता. अभिनेत्री शर्मिला शिंदेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या सगळ्याची झलक पाहायला मिळतेय.
आता केळवण पार पडल्यावर निखिल-अनुष्का लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. खरंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून निखिल-अनुष्का एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत…त्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. या दोघांनी ‘झी मराठी’च्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. जवळपास दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यादरम्यान अनुष्का-निखिलची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली होती. आता ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र येणार आहे.
दरम्यान, निखिल चव्हाणबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ‘लागिरं झालं जी’ मालिकेत अज्याच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली होती. ही सिरियल संपल्यावर पुढे वर्षभरातच निखिल ‘झी मराठी’च्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला. सध्या तो ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय.
