Star Pravah Muramba Serial Off Air : छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिका येत्या काही दिवसांत ऑफ एअर होणार आहेत. यामध्येच स्टार प्रवाहच्या एका लोकप्रिय मालिकेचा सुद्धा समावेश आहे. या मालिकेने जवळपास चार वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका येत्या दोन दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेईल. याच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ ही लोकप्रिय मालिका येत्या २८ जूनला प्रेक्षकांचा निरोप घेईल. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांनी मालिकेत अनुक्रमे अक्षय-रमा या भूमिका साकारल्या होत्या. रमा-अक्षयच्या नात्यात कायम रेवा कायम नवनवीन अडथळे आणत असते. आता वटपौर्णिमेच्या दिवशी ती रमा-अक्षयला गोळी मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रेवा या डावात यशस्वी होणार का? रमा-अक्षय या संकटापासून कसे वाचणार हे आपल्याला २८ तारखेच्या अंतिम भागात पाहायला मिळेल.
‘मुरांबा’ मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच शिवानी आणि शशांक यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना दिली होती.
‘मुरांबा’ ही मालिका स्टार प्रवाहवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जायची. प्रवाह दुपारमधील ही सगळ्यात यशस्वी मालिका आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता चार वर्षांनी १४०० हून अधिक भाग पूर्ण झाल्यावर ‘मुरांबा’ मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
‘मुरांबा’चा अंतिम भाग २८ जूनला दुपारी तीन वाजता प्रसारित केला जाईल. आता रेवाचा राग रमा-अक्षयच्या जीवावर बेतणार? की हे दोघं मिळून रेवाला चांगलीच अद्दल घडवणार हे या अंतिम भागातच स्पष्ट होईल.
दरम्यान, अंतिम भागाचा प्रोमो समोर येताच ‘मुरांबा’च्या चाहत्यांनी या पोस्टवर भावुक कमेंट्स केल्या आहेत. या मालिकेत शशांक आणि शिवानी यांच्यासह सुलेखा तळवलकर, निशाणी बोरुले, अभिजीत चव्हाण, प्रतिमा कुलकर्णी अशा लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी होती.
