Star Pravah Mi Kaat Takali Serial Updates : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. पण, या सगळ्यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती ‘मी कात टाकली’ या मालिकेची…यामध्ये प्रेक्षकांना नेहमीपेक्षा वेगळी नागकन्येची गोष्ट पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री सानिका मोजर यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. सानिकाला गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘नागीण’ भूमिकेसाठी तिचं कास्टिंग अगदी परफेक्ट असल्याचंही बोललं जात आहे. पण, या मालिकेचा हिरो कोण असणार, याबद्दलही सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर आता मालिकेच्या मुख्य नायकाचा चेहराही रिव्हिल करण्यात आला आहे.

‘मी कात टाकली’ या थ्रिलर मालिकेत नवोदित अभिनेता नितेश कांबळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी नितेश ‘आरपार’सारख्या गाजलेल्या सिनेमात झळकला होता. याशिवाय त्याने म्युझिक व्हिडीओ तसेच रंगभूमीवर सुद्धा उल्लेखनीय काम केलेलं आहे. आता नितेश छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘मी कात टाकली’ ही थ्रिलर मालिका रात्री उशिराच्या स्लॉटला प्रसारित केली जाईल, याबद्दल सर्वांना आधीच अंदाज होता. पण, आता स्टार प्रवाहने अधिकृतरित्या या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ जाहीर केली आहे.

‘मी कात टाकली’ ही मालिका येत्या २८ सप्टेंबरपासून रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका प्रेक्षक Star प्रवाहवर…आणि कधीही JioHotstar वर पाहू शकतात. नेटकऱ्यांनी या नव्या प्रोमोवर “काहीतरी नवीन बघायला मिळेल” अशा प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आता नवीन मालिका सुरू झाल्यावर वाहिनीवरील कोणती जुनी मालिका संपणार याबद्दलही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता ‘मी कात टाकली’ मालिकेला रात्री साडेदहाचा स्लॉट दिल्याने रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका संपणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. याबद्दल स्टार प्रवाहने अद्याप तरी अधिकृत घोषणा केलेली नाहीये.

आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका संपणार की, याची वेळ बदलली जाणार याबाबत लवकरच उलगडा होईल.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, ही सिरियल १८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या अडीच वर्षांत प्रेक्षकांनी यांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटला प्रसारित केली जात आहे.