Mi Savitribai Jyotirao Phule Serial Off Air : डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या ३ महिन्यांत तब्बल सहा नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे साहजिकच काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतील. मात्र, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका सुरू होऊन पाच महिनेच झाले होते.

मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये संपतेय हे दुर्दैव आहे. पण, त्यांची गोष्ट थांबणार नाही. एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल, असं डॉ. अमोल कोल्हेंनी ‘मुंबई टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं. तसेच ही मालिका १४ जूनला बंद होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…

डॉ. अमोल कोल्हे मुंटाशी संवाद साधताना म्हणाले, “शिक्षण हेच खरं सामर्थ्य’ हा विचार रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी बराच संघर्ष केला. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेतून प्रेक्षकांनी त्यांचा प्रवास पाहिला आहे. पण, खऱ्या अर्थाने त्यांची गोष्ट जिथून सुरू होते; त्याच टप्प्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र ही मालिका संपणार असली, तरी ही गोष्ट एका वेगळ्या व्यासपीठावर नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एकीकडे आपण महात्मा फुले यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय. पण, त्याचवेळी ही मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये संपतेय हे दुर्दैव आहे. पण, गोष्ट थांबणार नाही. लवकरच एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल.”

“मालिकेसाठी वाहिनीचे सतिश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर, अभिजीत खाडे यांनी खूप सहकार्य केलं. पण त्यांच्याही वर असणाऱ्यांची विचारप्रणाली नेमकी काय आहे, हे आपल्याला सांगता येत नाही”, असंही अमोल कोल्हे यांनी नमूद केलं आहे. याशिवाय मालिका टीआरपीमुळे बंद होतेय याविषयी अमोल कोल्हे म्हणाले, “ज्या मालिकांना टीआरपीच्या मोजपट्टीत बसवलं जातं, त्याच्या अर्काइव्ह व्हॅल्यूचा विचारही केला पाहिजे. राजा शिवछत्रपती ही मालिका आज एका वेगळ्या वाहिनीवर दाखवली जातेय. यासह स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकाही अनेक भाषांमध्ये डब झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे, अनेक लोक दैनंदिन मालिका… वाहिनीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण, टीआरपी फक्त सायंकाळी प्रसारित होणाऱ्या भागांचा मोजला जोत. त्यामुळे टीआरपीचं कारण हे माझ्यामते अर्धसत्य आहे.”

दरम्यान, आता १५ जूनपासून सायंकाळी ७:३० वाजता स्टार प्रवाहवर ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अशोक शिंदे, शर्मिष्ठा राऊत आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका आहेत.