Star Pravah Muramba Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत एकूण ८ नवीन शो सुरू होणार आहेत. त्यामुळे साहजिकच वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. आता लवकरच ऑफ एअर होणाऱ्या एका लोकप्रिय मालिकेचं नाव प्रेक्षकांसमोर आलेलं आहे. मालिकेच्या मुख्य नायिकेनेच यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘मुरांबा’ मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या मालिकेच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोघांनी साकारलेल्या रमा-अक्षयच्या भूमिकांना सर्वांचं भरभरून प्रेम मिळालं. नुकतेच या मालिकेचे १४०० भाग पूर्ण झाले. गेली चार वर्षे ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. पण, आता हा चार वर्षांचा प्रवास शेवटाकडे येऊन पोहोचला आहे. सर्वांची लाडकी ‘मुरांबा’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

अभिनेत्री शिवानी मुंढेकरने इन्स्टाग्रामवर सेटवरचा मिरर सेल्फी शेअर करत यावर ‘One Last Time…रमा म्हणून शेवटचे काही क्षण’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या सेल्फीमध्ये शिवानी रमाच्या लूकमध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून ‘मुरांबा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबतच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेला सगळेजण मिस करणार आहेत. खरंतर, ही मालिका पहिल्या दिवसापासून दुपारच्या सत्रातच प्रसारित करण्यात आली होती. ही ‘प्रवाह दुपार’ मधील सर्वात यशस्वी मालिका आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलल्यामुळे सध्या ‘मुरांबा’ दुपारी ३ वाजता ऑन एअर होतेय, आणि आता लवकरच ही मालिका संपणार आहे.

muramba serial off air
शिवानी मुंढेकरची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, मुरांबा मालिकेत प्रेक्षकांना शशांक-शिवानीसह निशाणी बोरुले, सुलेखा तळवलकर, अभिजीत चव्हाण, प्रतिमा कुलकर्णी, काजल काटे, मीरा सारंग, आरंभी उबाळे, सिद्धार्थ खिरीड अशा लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. आता ‘मुरांबा’ मालिकेचा शेवटचा भाग केव्हा प्रसारित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.