Star Pravah Nasheebvan Serial Off Air : मराठी मालिकांमध्ये सध्या टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळेच अनेक मालिकांच्या वेळेत बदल केला जात आहे. तर, छोट्या पडद्यावरच्या काही लोकप्रिय मालिका ४५ मिनिटं प्रसारित केल्या जात आहेत. पण, अशातच एक मोठी अपडेट नुकतीच प्रेक्षकांसमोर आलेली आहे. ‘स्टार प्रवाह’ची मल्टिस्टारर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वाहिनीकडून या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. यामुळे चाहते देखील नाराज झाले आहेत.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सप्टेंबर २०२५ मध्ये ‘नशीबवान’ ही मल्टिस्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, सोनाली खरे, नेहा नाईक या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. दमदार स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या मालिकेकडून भरपूर अपेक्षा होत्या. ‘नशीबवान’ला रात्री नऊ वाजताचा प्राइम स्लॉट सुद्धा देण्यात आला होता. पण, या सिरियलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. टीआरपीमध्येही झी मराठीची ‘कमळी’ मालिका ‘नशीबवान’वर वरचढ ठरत होती. अखेर या मालिकेची वेळ काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून ‘नशीबवान’ मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जात होती. पण, आता लवकरच ही सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये नागेश्वर गिरिजा आणि तिच्या आईला त्यांच्या घराला आग लावून दोघींना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. पण, या प्लॅनमध्ये तो स्वत:च अडकतो. रुद्रप्रताप वेळेवर आपल्या बायकोला वाचवण्यासाठी पोहोचतो. सगळे या संकटातून सुखरुप बाहेर येतात. पण, यावेळी गिरिजा नागेश्वरला सांगते, ज्या कागदपत्रांवर तू सह्या घेतल्या ते कागद आतच राहिलेत. प्रॉपर्टीच्या लालसेपोटी नागेश्वर पुन्हा कागदपत्र आणण्यासाठी आगीत उडी घेतो आणि इथेच त्याचा दुर्दैवी अंत होतो.

‘नशीबवान’ मालिकेचा हा शेवटचा भाग २५ एप्रिलला दुपारी २:३० वाजता प्रसारित केला जाईल. यानंतर २७ एप्रिलपासून अडीच वाजताच्या स्लॉटला ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.

तर, ऊर्जा-इंद्रनीलची ‘वचन दिले तू मला’ ही मालिका सायंकाळी साडेसहा ( ६:३० ) वाजता ऑन एअर होईल.