Star Pravah Serial Updates : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २७ एप्रिलपासून ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अक्षता प्रमोद आणि अर्णव वॅरिअर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ही नवीन मालिका रात्री १० वाजता ऑन एअर होणार आहे. सध्या या स्लॉटला ‘वचन दिले तू मला’ ही मालिका प्रसारित केली जाते.
गेल्या काही महिन्यांत ‘वचन दिले तू मला’ या मालिकेची अनेकदा वेळ बदलण्यात आली. अखेर आता ही मालिका दुपारच्या सत्रात शिफ्ट करण्यात आली आहे. ‘बाई तुझा आशीर्वाद’ २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे, त्याचदिवशी ‘वचन दिले तू मला’ एका नव्या वेळेत प्रसारित केली जाईल.
‘वचन दिले तू मला’ ही मालिका आता दुपारच्या सत्रात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दुपारी २:३० वाजताची वेळ या सिरियलला देण्यात आली आहे. ‘स्टार प्रवाह’ने अधिकृतरित्या याबद्दलची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
सध्या ‘स्टार प्रवाह’वर दुपारी अडीच वाजता ‘नशीबवान’ मालिका प्रक्षेपित केली जाते. आता जर ‘वचन दिले तू मला’ या मालिकेला अडीच वाजताची वेळ देण्यात आलीये, तर ‘नशीबवान’ ऑफ एअर होण्याची दाट शक्यता नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये वर्तवली आहे.
‘नशीबवान’ ही लोकप्रिय मल्टीस्टारर मालिका सप्टेंबर २०२५ मध्ये ऑन एअर झाली. या मालिकेला सुरू होऊन आता जवळपास ७ महिने झाले आहेत. आता ‘वचन दिले तू मला’ची नवीन वेळ जाहीर झाल्यावर ‘नशीबवान’ अवघ्या ७ महिन्यांत गाशा गुंडाळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. अद्याप ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर केलेला नाहीये.
आता खरंच ‘नशीबवान’ मालिका संपणार की, पुन्हा या सिरियलची वेळ बदलली जाईल हे लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यान, ‘नशीबवान’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, अजय पूरकर, सोनाली खरे या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीला ही मालिका ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जायची. मात्र, सध्या ही मालिका दुपारी २:३० वाजता ऑन एअर होतेय. आता ही मालिका संपणार की पुन्हा याची वेळ बदलली जाणार हे लवकरच अधिकृतरित्या सांगितलं जाईल.
