Star Pravah New Serial Tuzyakade Tula Magane Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी कात टाकली’, ‘मराठी मिडियम’ या मालिकांचा यामध्ये समावेश आहे. अशातच आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’कडून लॉन्च करण्यात आला आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझ्याकडे तुला मागणे’. विशेष म्हणजे या सिरियलमधून स्टार अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
राकेश बापटच्या यापूर्वीच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. त्याने साकारलेल्या रुबाबादार AJ च्या भूमिकेने सर्वांनाच भुरळ पाडली होती. यानंतर राकेशने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतली होती. सहाव्या सीझनचा तो उपविजेता ठरला होता. ‘नवरी मिळे हिटलरला’च्या यशानंतर राकेश पुन्हा एकदा टेलिव्हिजन गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये राकेश ऑनस्क्रीन बाबाची भूमिका साकारताना दिसेल. विशेष म्हणजे त्याच्या वाढदिवसानिमित्त हा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे.
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता राकेश बापटला स्टार प्रवाहकडून वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळालं आहे. राकेशच्या वाढदिवसाच्याच दिवशी स्टार प्रवाहच्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असून, या मालिकेत राकेश अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. ‘अभिमान सरदेसाई’ असं त्याच्या पात्राचं नाव असून, अतिशय प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा असलेला यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याच्या भूमिकेत राकेश दिसणार आहे. वाढदिवसाच्या दिवशी नव्या मालिकेची घोषणा झाल्यामुळे राकेशसाठी यंदाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला आहे.
राकेशच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका या मालिकेत बालकलाकार क्रियान पेडणेकर साकारणार आहे. अभिनेत्याची बहीण शीतल बापट यांनी, “हा प्रोमो खरंच खूप सुंदर आहे…आता या मालिकेची आतुरतेने वाट पाहतोय” अशी कमेंट या नव्या सिरियलच्या प्रोमोवर केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील राकेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आता राकेश बापटची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका किती वाजताच्या स्लॉटला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, या सिरियलला प्राइम टाइम मिळेल का? याचा उलगडा ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेच्या पुढील प्रोमोतून होईल.
