Star Pravah New Serial Bai Tuza Ashirvad Promo: ‘स्टार प्रवाह’वर ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला कोणती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलून काही दिवसांपूर्वीच ही सिरियल दुपारच्या स्लॉटला शिफ्ट करण्यात आली. त्यामुळे ‘स्टार प्रवाह’वर नऊ वाजताचा प्राइम स्लॉट रिकामा होता. सध्या या वेळेत ‘ठरलं तर मग’ मालिका पाऊण तास प्रसारित केली जात आहे. पण, आता लवकरच रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ने शेअर केली होती. आता या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांसमोर आलेला आहे. याशिवाय मालिकेची लॉन्च तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेचा नायक धनराज गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न करण्यासाठी मुलगी शोधतोय, हातात बॅनर घेऊन फिरतोय असं सर्वांना पाहायला मिळतंय. आता या धनराजला त्याच्या मनासारखी, त्याचं घर सांभाळेल अशी मुलगी केव्हा भेटणार याचा प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मालिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी

‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये धनराज हे पात्र अभिनेता अर्णव वारियर साकारणार आहे. तर, त्याच्या सोबतीला प्रमुख भूमिकेत झळकणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता तळे. आजवर अर्णव व अक्षता रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. पण, आता यांची फ्रेश जोडी ‘बाई तुझा आशीर्वाद’मधून घराघरांत पोहोचणार आहे.

‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या प्रोमोमध्ये धनराज आपल्या बायकोला लग्न झाल्यावर गाडीतून घरी घेऊन जात असतो आणि रस्त्यात सर्वांची ओळख करून देतो असं पाहायला मिळतं. धनराज सांगतो, “आपल्या घरात असतात… माझे तीन स्टार भाऊ आणि एक सुपरस्टार बाप…माझा मोठा भाऊ यशोधन, दुसरा भाऊ धनपाल, छोटा भाऊ धनेश आणि माझे बाबा म्हणजे आमचे अण्णा…मस्तय सगळं!”

अक्षता तळे, अर्णव वारियर ( धनराज धोंडीराज दांगट ) यांच्यासह या नव्या मालिकेत सुनील तावडे ( बाबा ), पुष्कर सरद ( मोठा भाऊ ), सतीश तांदळे ( दुसरा भाऊ), राघव वर्तक ( लहान भाऊ ) अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.

दरम्यान, ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ३० मार्चपासून रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाईल. आता या आगळ्यावेगळ्या कथेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.