‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने एक नवा विषय स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या केंद्रस्थानी आहे घरातील स्त्री. पण, ज्या घराला बाईच्या असण्याची सवयच नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने घराला घरपण येतं. अशा धनराज आणि अवनी यांची गोष्ट या नव्या मालिकेतून सर्वांना पाहायला मिळेल.
मालिकेत घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका साकारणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद. आता अक्षताबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात डिग्री घेतलेल्या अक्षताला बालपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. ७ वर्षांची असतानाच तिने कथक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर ‘गुड बाय किस’, ‘अत्तरमन’ अशा अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली.
‘बाई तुझा आशीर्वाद’मधील अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल.
अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखील खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने व्यक्त केली. दरम्यान, आता लवकरच ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.
मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार
अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद आणि अभिनेता अर्णव वॅरिअर यांची जोडी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. अक्षता आणि अर्णव यांच्यासह या मालिकेत सुनील तावडे, पुष्कर सरद, सतीश तांदळे, राघव वर्तक, शरद पोंक्षे, सीमा घोगळे अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकर स्वत: या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
