Star Pravah New Serial Marathi Medium : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एका पाठोपाठ एक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मी कात टाकली’, ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकांनंतर आता स्टार प्रवाहने ‘मराठी मिडीयम’ सिरियल केव्हा लॉन्च होईल? याचा उलगडा नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोमधून केला आहे. “आपली मराठी शाळा मी बंद पडू देणार नाही” असा निश्चिय करणारी एक नवीन नायिका या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नव्या मालिकांमध्ये लीड भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं कायमच लक्ष असतं. वाहिनीच्या आगामी ‘मराठी मिडीयम’ या नव्या मालिकेत प्रसिद्ध रीलस्टार अभिनेत्री लीड भूमिका साकारणार आहे; तिचं नाव आहे श्रद्धा पवार. आजवर विविध म्युझिक अल्बममध्ये झळकलेली श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचं ‘माझी बाय गो, माझी बायगो…’ हे गाणं सर्वत्र तुफान हिट झालं होतं. अशा बऱ्याच गाजलेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये श्रद्धाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता सोशल मीडिया गाजवणारी श्रद्धा छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘मराठी मिडीयम’ या मालिकेती ती सरस्वतीची भूमिका साकारणार आहे. ही सरस्वती शाळेत शिक्षिका असते…मुलांना उत्तम संस्कार, उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. आता श्रद्धाबरोबर यामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार? याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या अभिनेत्याचं नावंही आता सर्वांसमोर आलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेता अक्षय नलावडे ‘मराठी मिडीयम’ मालिकेचा मुख्य नायक आहे.

काहीही झालं तरी मी आपली मराठी शाळा वाचवणार, मी आपल्या शाळेला कधीही बंद होऊ देणार नाही असा निश्चय सरस्वतीने केलेला आहे. आता तिच्या या निश्चयाच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा कोण असेल? इथून पुढे, सरस्वतीचं आयुष्य कसं बदलणार, ती खरंच मराठी शाळांचं संरक्षण करू शकेल का? हा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

ऑक्टोबर महिन्यापासून ही मालिका ऑन एअर होईल. सध्या ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची रिलीज डेट जाहीर केलेली नाहीये. आता ‘मराठी मिडीयम’ मालिका कधी सुरू होणार, या मालिकेच्या प्रसारणाचा स्लॉट किती वाजताचा असेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.