Star Pravah Pathrakhin New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या जून महिन्यांत दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी पहिली मालिका आहे प्राजक्ता गायकवाडची मुख्य भूमिका असलेली ‘पाठराखीण’. तर, दुसऱ्या ‘सुना येती घरा’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब प्रमुख भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताच्या ‘पाठराखीण’ मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख स्टार प्रवाहकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या मालिकेला प्राइम टाइम मिळाला आहे.

‘पाठराखीण’ ही मालिका येत्या १ जूनपासून रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामध्ये प्राजक्ता गायकवाडसह गौरी इंगवले, राष्ट्रीय पुरस्कार विजेती लोकप्रिय अभिनेत्री मिताली जगताप, अभिनेते रमेश वाणी, दीप्ती लेले, शकुंतला नरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

कोणतीही मालिका संपणार नाही कारण…

‘पाठराखीण’ मालिकेला ‘स्टार प्रवाह’ने रात्री नऊ वाजताचा प्राइम टाइमचा स्लॉट दिला आहे. आता नव्या मालिका सुरू झाल्यावर जुनी कोणती मालिका संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. मात्र, ‘पाठराखीण’ मालिकेच्या बाबतीत असं घडणार नाही. स्टार प्रवाहवर सध्या ‘ठरलं तर मग’ मालिका ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे. या मालिकेची वेळ आता पूर्ववत रात्री ८:३० वाजताची केली जाईल आणि ‘पाठराखीण’ मालिका नऊ वाजता प्रसारित होईल.

‘ठरलं तर मग’शी खास कनेक्शन…

‘पाठराखीण’ या नव्या मालिकेच्या निर्मितीची धुरा बांदेकर कुटुंबीयांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ने सांभाळली आहे. तर, ‘ठरलं तर मग’ या टीआरपी टॉपर मालिकेची निर्मिती सुद्धा सोहम प्रोडक्शन यांनीच केली आहे. त्यामुळे हा या दोन मालिकांमधला समान धागा आहे.

नव्या मालिकेचं कथानक…

प्राजक्ता गायकवाड या मालिकेत ‘प्राजक्ता कुलकर्णी’ ही भूमिका साकारणार आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. प्राजक्ताच्या मामा-मामींच्या मुलीला पाहण्यासाठी स्थळ येतं पण, ते लोक प्राजक्ताला पसंत करतात. यामुळेच घरात गोंधळ निर्माण होतो. पण, शेवटी प्राजक्ता मामीला बहिणीसाठी जीवही देईन, असं वचन देते.

बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, स्टार प्रवाहची ही नवीन ‘पाठराखीण’ मालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.