Star Pravah Prajakta Gaikwad New Serial Pathrakhin Promo : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सुरू होत्या. अखेर या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या असून, तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘पाठराखीण’ मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्राजक्तासह यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री गौरी इंगवले प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही मालिका येत्या १ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘स्टार प्रवाह’ने अद्याप या मालिकेची वेळ जाहीर केलेली नाही.
‘पाठराखीण’ या नव्या मालिकेच्या निर्मितीची धुरा बांदेकर कुटुंबीयांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ने सांभाळली आहे. यामध्ये प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेती लोकप्रिय अभिनेत्री मिताली जगताप महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मिताली प्राजक्ताची मामी आणि गौरीची ऑनस्क्रीन आई आहे.
यासह लोकप्रिय अभिनेते रमेश वाणी ( मामा- चंद्रशेखर वैद्य ) ‘पाठराखीण’मध्ये प्राजक्ता गायकवाडच्या मामांची भूमिका साकारतील. यापूर्वी ते स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकले होते. अभिनेत्री दिप्ती लेले, शकुंतला नरे यांचीही झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता गायकवाड या मालिकेत ‘प्राजक्ता कुलकर्णी’ ही भूमिका साकारणार आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. प्राजक्ताच्या मामा-मामींच्या मुलीला पाहण्यासाठी स्थळ येतं पण, ते लोक प्राजक्ताला पसंत करतात. यामुळेच घरात गोंधळ निर्माण होतो. पण, शेवटी प्राजक्ता मामीला बहिणीसाठी जीवही देईन, असं वचन देते.
बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, स्टार प्रवाहची ही नवीन मालिका १ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या मालिकेची वेळ जाहीर केली जाईल.
