Suna Yeti Ghara Star Pravah New Serial : ‘स्टार प्रवाह’ने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘पाठराखीण’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रमुख भूमिका साकारणार आहे. आता या पाठोपाठ वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचं नाव आहे ‘सुना येती घरा’!
‘सुना येती घरा’ ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे प्रोमो पाहून स्पष्ट झालेलं आहे. मात्र, वाहिनीने अद्याप या मालिकेची लॉन्च डेट जाहीर केलेली नाहीये. सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तर, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
दीपा परब या मालिकेत उमावतीची भूमिका साकारेल. तर शर्मिष्ठाच्या भूमिकेचं नाव आहे पद्मावती. या दोघीही बहिणी असतात. मात्र, उमावती घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन शिवनाथशी लग्न करते. यानंतर शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबात एक दरी निर्माण होते. हे भांडण गेली अनेक वर्षे सुरू असतं. लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदे या मालिकेत शिवनाथ ही भूमिका साकारणार आहेत. ही त्यांची स्टार प्रवाहबरोबरची नववी मालिका आहे.
प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आता ही मालिका केव्हापासून सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
दरम्यान, ‘सुना येती घरा’ या मालिकेचा पहिला प्रोमो पाहूनच ही सिरियल नेमका कोणत्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट झालं आहे. स्टार प्रवाहची ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका कलर्स टीव्हीवरील ‘महादेव अँड सन्स’ या मालिकेचा हिंदी मालिकेचा आहे अशी माहिती समोर येत आहे, अशा असंख्य कमेंट्सही या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “सासू, सासरे, सुना आणि मुलांना एकत्र बांधून ठेवणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडेल. एका घरात तीन सुना आल्यावर कथेची गंमत वेगळीच होईल. परस्पर नातेसंबंधावर भाष्य करणारी ही मालिका हृदयस्पर्शी असेल ही खात्री आहे.”
