Star Pravah New Serial Visaru Nako Tu Mala : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर IPL संपताच १ जूनपासून नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. १ तारखेलाच प्राजक्ता गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ‘पाठराखीण’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका रात्री ९ वाजता ऑन एअर होईल. तर, या पाठोपाठ १५ जूनपासून स्टार प्रवाहवर ‘सुना येती घरा’ ही मल्टीस्टारर मालिका सुरू होईल. यामध्ये दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे अशा दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असतील. या दोन नव्या मालिकांच्या घोषणेनंतर आता वाहिनीने सगळ्या प्रेक्षकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.
२९ जूनपासून आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरियलचं नाव आहे ‘विसरू नको तू मला’. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर नेटकऱ्यांसमोर आलेला आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
शाल्वने यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि सुपरहिट ‘शिवा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तर, तन्वीला झी मराठीच्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेमुळे घराघरांत एक ओळख मिळाली. यानंतर तिने निवेदिता सराफ आणि विवेक सांगळे यांच्यासह ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत काम केलं. सध्या ती नाटकात काम करतेय. मात्र, आता पुन्हा एकदा टेलिव्हिजन गाजवण्यासाठी तन्वी सज्ज झाली आहे.
आता शाल्व आणि तन्वीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘विसरू नको तू मला’ या मालिकेत पाहायला मिळेल. तन्वी ‘डॉ. वैदेही’ ही भूमिका साकारणार आहे. तर, शाल्वचं ‘सूर्या’ची भूमिकाची साकारेल. सूर्या दशावतारात काम करणारा कलाकार असतो असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. डॉ. वैदेहीच्या आईची आठवण असलेली स्कूटर तो तिला दुरुस्त करून देतो. त्यानंतर दोघंही स्कुटीवर बसून निघताता आणि वाटेत तो वैदेहीला म्हणतो, “मी सूर्या विसरू नका हा मला…”
आता २९ जूनपासून ‘विसरू नको तू मला’ ही मालिका कोणत्या स्लॉटला सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लवकरच स्टार प्रवाहकडून या मालिकेच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर करण्यात येईल.
