Star Pravah Me Honar Superstar – Chhote Ustaad : टेलिव्हिजन मालिकांप्रमाणे छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोचा देखील एक वेगळा चाहतावर्ग आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा शो सुरू झाल्यापासून अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो.
सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं चौथं पर्व सुरू आहे. आता हा चौथा सीझन अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या २८ डिसेंबरला चौथ्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडेल.
स्टार प्रवाहने नुकतीच त्यांच्या नव्या शोची घोषणा केली आहे. वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून “तुम्हाला भेटायला महाराष्ट्रातील विविध शहरांमधून तारा येतोय/येतेय” अशा पोस्ट शेअर करण्यात येत होत्या. यावरून लवकरच नव्या शोची घोषणा केली जाईल असा अंदाज प्रेक्षकांना आला होता. प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाचं चौथं पर्व ३ जानेवारीपासून ऑन एअर होणार आहे. हा शो शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल. या शोद्वारे प्रेक्षकांना छोट्या मुलांच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. गायिका वैशाली सामंत या कार्यक्रमात परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. आता चौथ्या सीझनमध्ये तिच्यासह आणखी कोण-कोण झळकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.
दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाची पहिली झलक समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा शोमध्ये परीक्षक म्हणून आदर्श शिंदे हवेत अशाही प्रतिक्रिया चाहत्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.
