Actress Pooja Birari Viral Video : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२६’ नुकताच थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात यावर्षी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी मारली आहे. या पुरस्कार सोहळ्याचं होस्टिंग लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि ‘वचन दिले तू मला’ फेम अभिनेत्री अनुष्का सरकटे यांनी केलं.
अभिजीत आणि अनुष्का यांनी पुरस्कार सोहळ्यात एका स्किटदरम्यान ‘स्टार प्रवाह’च्या नायिकांची नक्कल केली. याचदरम्यान, अनुष्काने ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील मंजिरीची अॅक्टिंग केली. पण, अभिजीत मंजिरीबद्दल म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारीबद्दल मुद्दाम काहीच बोलला नाही. हे पाहून अनुष्का त्याला म्हणाली, “तू सगळ्यांची मस्करी करतोस ना…आता तिला बोलना, प्रत्येकाबद्दल तुला काही ना काही बोलायचं असतं… आता बोल मंजिरीबद्दल… मी ऐकतेय तू आता बोलच. मला बघायचं आहे तू काय बोलतोस.”
यावर अभिजीत पूजा बिरारीची फिरकी घेत म्हणाला, “अगं थांबना…मंजिरीला काही बोललं तर राया मारतो. त्यापेक्षा… आता तर काही बोलायची सोयच नाहीये. कारण, तिचे सासू-सासरेच प्रोड्युसर आहेत. जरा काही बोललं की… एक आदेश येईल आणि माझ्या चेहऱ्याचं सुचित्र बिघडेल त्यानंतर मग मी जाईन हिमालयात…. सोहमmmmm म्हणत. त्यामुळे नको.”
अभिजीतने पूजाची फिरकी घेतल्यावर संपूर्ण पुरस्कार सोहळ्यात एकच हशा पिकला होता. स्वत: पूजा सुद्धा हसत होती… यावेळी पूजाच्या सासूबाई सुचित्रा बांदेकर सुद्धा उपस्थित होत्या. अभिजीतने सुनेची फिरकी घेतल्यावर सुचित्रा बांदेकरांनी सुद्धा टाळ्या वाजवून हसत त्याला दाद दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पूजा बिरारीच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, टीआरपी टॉपर मालिका ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही मालिकांची निर्मिती सोहम प्रोडक्शन मार्फत करण्यात आली आहे. पूजा व सोहमचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात थाटामाटात पार पडला. यानंतर बांदेकर कुटुंबीयांनी मुंबई सुद्धा सोहम-पूजाच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.
