Star Pravah Parivar Puraskar 2026 TRP Updates : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ या सोहळ्याचं टेलिव्हिजनवर प्रक्षेपण १५ मार्चला करण्यात आलं. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार विजेत्या कलाकारांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकत या सोहळ्यात बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. पण, ‘ठरलं तर मग’ मालिकेची महामालिका होण्याची हॅटट्रिक हुकल्याने अनेक चाहते नाराजही झाले.

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात यावर्षी काही खास गोष्टी घडल्या. कलाकारांना घडवणाऱ्या, त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरलेल्या शिक्षकांचा विशेष सन्मान या मंचावर करण्यात आला. बहुतांश कलाकारांच्या शिक्षिका या खास प्रसंगी उपस्थित होत्या. गुरुजनांना पुन्हा भेटण्याचा क्षण कलाकारांसाठी अत्यंत भावनिक होता. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर काहींनी शिक्षकांच्या आशीर्वादामुळेच आज या उंचीवर पोहोचल्याचं सांगितलं. यावेळी प्रेक्षकही भावुक झाले होते.

‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्याची यंदाची थीम ‘वेस्टर्न आउटफिट’ होती. या थीमनुसार कलाकारांनी एकापेक्षा एक आकर्षक आणि स्टायलिश पोशाख परिधान करत रेड कार्पेटवर आपला ठसा उमटवला. याशिवाय विविध मालिकांमधील जोड्यांनी रोमँटिक गाण्यांवर खास परफॉर्मन्स सादर केले. यासह खलनायिकांचा परफॉर्मन्स सुद्धा विशेष लक्षवेधी ठरला. आता अशा या लोकप्रिय कार्यक्रमाला किती टीआरपी मिळाला असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला असेल. नुकतीच यासंदर्भातील पोस्ट स्टार प्रवाहकडून शेअर करण्यात आली आहे.

Award Banner

‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्याचा TRP किती?

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला आहे. ‘मनोरंजनाचा विक्रमी षटकार’ असं कॅप्शन देत वाहिनीने टीआरपीची आकडेवारी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. स्टार प्रवाहची टीम लिहिते, “सलग ६ वर्षे सर्वोच्च GRP मिळवणारा एकमेव कार्यक्रम…आपण या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना”

‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्याचा TVR आहे ३.२! याशिवाय ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला १.७ TVR मिळाला आहे. त्यामुळे सलग सहा वर्षे ‘स्टार प्रवाहचा पुरस्कार’ शो यामध्ये बाजी मारत असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या संपूर्ण टीआरपीबद्दल सांगायचं झालं तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेला गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सर्वाधिक टीआरपी मिळतोय. यानंतर दुसऱ्या स्थानी आहे अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. आता नऊ वाजता या वाहिनीवर कोणती नवीन मालिका सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.