गेल्या महिन्याभरात छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेली २ वर्षे अधिराज्य गाजवणारी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुद्धा नुकतीच संपली. ५ जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. मालिकेचा शेवट झाल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळे याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता राज हंचनाळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोळी ही प्रमुख भूमिका साकारत होता. मुक्ता आणि सागरची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाली होती. या दोघांच्या नात्यात सावनी ( मालिकेची खलनायिका व सागरची पहिली पत्नी ) दुरावा निर्माण करण्याचा अनेकदा प्रयत्न करते. पण, शेवटी संपूर्ण कोळी कुटुंबीयांसमोर सावनीचा खोटेपणा उघड होतो. यानंतर घराला खंबीरपणे सावरल्यामुळे सागर मुक्ताचे आभार मानतो आणि ही मालिका संपते.
आता मालिका संपल्यावर राजने सेटवरचे अनेक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज हंचनाळे लिहितो, “माझ्या वाट्याला जे काही आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला. या प्रवासात माझ्याबरोबर असलेले सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि ही संधी दिल्याबद्दल ‘स्टार प्रवाह’ आणि शशी-सुमीत प्रोडक्शन या सगळ्यांचे आभार. पुढच्या प्रोजेक्ट्मध्ये पुन्हा तुमचं मनोरंजन करण्याची आणि मन जिंकण्याची संधी मिळो. तुम्हा सर्वांनी जे प्रेम दिलंत त्यासाठी खूप खूप आभार. मनापासून… सागर कोळी. Byeee”
दरम्यान, राजने शेअर केलेल्या पोस्टवर मालिकेत सावनी या खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने खास कमेंट केली आहे. “माय Dear सागर…तुझा त्रास संपला. मजा आली तुझ्याबरोबर काम करून लवकरच भेटू मित्रा”
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झाली होती. मालिका सुरू झाल्यावर यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिका साकारत होती. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायम टॉप-५ मध्ये असायची. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये तेजश्रीने मालिका सोडल्यावर याचा मोठा परिणाम टीआरपीवर झाला आणि आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे.