‘स्टार प्रवाह’वर लवकरच मालिकाविश्वातील सुपरस्टार अभिनेता राकेश बापटची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरियलचं नाव आहे ‘तुझ्याकडे तुला मागणे’! काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून याची नायिका कोण असणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे “इरा”या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सायली साळुंखेने यापूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय हिंदी मालिकाविश्वातही तिने बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. आता ती राकेश बापटसह ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची ‘इरा’ तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली इरा अत्यंत मायाळू, बोलायला लाघवी आणि माणसं जपणारी आहे. आपल्या बोलण्याने समोरच्याचा राग शांत करण्याची कला तिच्याकडे आहे. तिला तिचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ती अत्यंत हळवी आहे. प्रामाणिक माणसांसाठी त्याग करण्याची तिची नेहमीच तयारी असते. मात्र तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कुणी तिच्याकडून त्यागाची अपेक्षा केली, तर हीच शांत आणि प्रेमळ इरा अन्यायाविरोधात पेटून उठते.
या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली, “इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाहशी खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय. आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सुरू असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेच्या निमित्ताने ही संधी चालून आली…तुम्ही सुद्धा ही मालिका नक्की पाहा.”
लवकरच ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख जाहीर केली जाईल.
