Star Pravah Saadhi Maansa Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या ३० मार्चपासून ‘आनंदी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाईल. यामुळे ‘स्टार प्रवाह’वर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता ३० मार्चपासून ‘वचन दिले तू मला’ ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे. या स्लॉटला सध्या शिवानी बावकरची ‘साधी माणसं’ मालिका प्रसारित केली जाते.

‘वचन दिले तू मला’ मालिकेची वेळ बदलणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यानंतर ‘साधी माणसं’ या मालिकेचं काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. काही प्रेक्षकांनी ‘साधी माणसं’ची वेळ बदलतील असा अंदाजही वर्तवला होता. पण, आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ‘साधी माणसं’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेच्या सेटवर नुकताच शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी सगळे कलाकार उपस्थित होते आणि २ वर्षांचा प्रवास संपणार असल्याने अनेक कलाकार सुद्धा यावेळी भावुक झाले होते.

Award Banner

‘साधी माणसं’ मालिकेचा पहिला एपिसोड मार्च २०२४ मध्ये ऑन एअर झाला होता. आता बरोबर दोन वर्षांनी ही मालिका सर्वांचा निरोप घेतेय. अद्याप ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. लवकरच मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. २९ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग ऑन एअर होईल असं बोललं जात आहे.

‘साधी माणसं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या दोघांनी साकारलेली सत्या-मीराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. याशिवाय मालिकेत सुप्रिया पाठारे, पंढरीनाथ कांबळे, पंकज खामकर, प्रशांत चौडप्पा, प्रतिभा गायकवाड, मोनिका यांसारखे बरेच कलाकार झळकले आहेत.

दरम्यान, ‘साधी माणसं’ मालिकेनंतर अभिनेत्री शिवानी बावकर कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या मालिका संपणार असल्याची बातमी समोर येताच या सिरियलचे चाहतेही भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स करत “प्लीज मालिका इतक्या लवकर संपवू नका” अशी विनंती चाहत्यांनी ‘साधी माणसं’च्या टीमला केली आहे.