Marathi Serial Off Air : जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘साधी माणसं’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका मार्च २०२४ रोजी ऑन एअर झाली होती. गेल्या दोन वर्षांत सत्या आणि मीरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. पण, आता या लाडक्या जोडीने सर्वांचा निरोप घेतला आहे.

‘साधी माणसं’मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मालिकेचा शेवट झाल्यावर शिवानीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिवानी बावकर म्हणते, “सत्या-मीरा यांचा दोन वर्षांचा प्रवास इथे संपतो आहे…आणि या प्रवासात तुम्ही आमची साथ दिलीत, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी प्रेक्षक म्हणून आम्हाला भरपूर साथ दिली. सतिश राजवाडे सरांनी आमच्यावर विश्वास ठेवला. शमा सय्यद मॅम तुम्ही नेहमीच आमच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिलात. यासह आमच्या प्रोडक्शन कंपनीचेही आभार”

Award Banner

तर, आकाश नलावडे म्हणतो, “साधी माणसं मालिकेचा प्रवास इथे संपला पण, आठवणी कायम राहतील. या सुंदर पप्रवासाचा भाग होऊ दिल्याबद्दल कलाकार, टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

मालिका संपल्यावर हे सगळे कलाकार एकत्र एन्जॉय करण्यासाठी पनवेल येथील एका अ‍ॅग्रो फार्ममध्ये गेले होते. याचे फोटोही शिवानी बावकरने शेअर केले आहेत. “जेव्हा साधी माणसं…साध्या नव्हे तर स्पेशल आऊटिंगसाठी बाहेर जातात.” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

‘साधी माणसं’ मालिकेचा पहिला एपिसोड मार्च २०२४ मध्ये ऑन एअर झाला होता. आता बरोबर दोन वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे. २९ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे यांच्यासह या मालिकेत सुप्रिया पाठारे, पंढरीनाथ कांबळे, पंकज खामकर, प्रशांत चौडप्पा, प्रतिभा गायकवाड, मोनिका यांसारखे बरेच कलाकार झळकले आहेत.

दरम्यान, आता ‘साधी माणसं’ मालिका संपल्यावर ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.