Marathi Actor Abhijit Amkar : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सुरू झाली. यामध्ये प्रेक्षकांना अर्णव आणि ईश्वरीची प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. या भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग व अभिनेता अभिजीत आमकर यांनी साकारल्या आहेत. हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिजीत आमकरने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिजीत आमकर खऱ्या आयुष्यात लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्राला डेट करत आहे. नुकतीच ती ‘ऑल इज वेल’ चित्रपटात झळकली होती. याशिवाय नक्षत्राने ‘लेक माझी लाडकी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. ‘प्रीतम’, ‘फतेशिकस्त’, ‘सापळा’ यांसारख्या सिनेमांमध्येही नक्षत्राने काम केलेलं आहे.
आज नक्षत्राच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिजीतने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता लिहितो, “हॅपी बर्थडे बेबी…माझ्या मोबाइलमध्ये कायम तुझाच वॉलपेपर असेल…” या पोस्टसह अभिनेत्याने त्याच्या मोबाइलच्या वॉलपेपरचे स्क्रिनशॉट देखील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यामध्ये नक्षत्रा आणि अभिजीत यांचे रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहेत.
अभिजीतच्या पोस्टवर रेश्मा शिंदे, ऋतुजा बागवे, मधुरा जोशी, रुपल नंद, मेघना एरंडे अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत नक्षत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी देखील अभिजीतच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, अभिजीत आमकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘अरे वेड्या मना’ या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. याशिवाय अभिजीत अनेक चित्रपटांमध्येही झळकला आहे. सध्या तो ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. शर्वरी आणि अभिजीतची ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाते.