Star Pravah Premachi Goshta Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन बदल होत असतात. अनेकदा या मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्री होतात, तर काही वेळा जुने कलाकार मालिका सोडून जातात. ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका तेजश्री प्रधानच्या एक्झिटमुळे यंदाच्या वर्षी चर्चेत राहिली. आता तेजश्री पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या मुक्ता आदित्यच्या जीवावर उठलेल्या हर्षवर्धनला धडा शिकवणार असल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळत आहे. मालिकेचं कथानक रंजक वळणावर असतानाच यामधून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत स्वातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कोमल सोमारे गजमल हिने अलीकडेच या मालिकेला रामराम केला आहे. स्वाती ही सागर कोळीची बहीण असते. या अभिनेत्रीने मालिका सोडल्याची माहिती स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.
अभिनेत्री लिहिते, “स्वाती या पात्राचा निरोप घेण्याची वेळ आली आहे… पण, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील आठवणी माझ्याबरोबर कायम राहतील. या सुंदर मालिकेचा भाग होण्याची मला संधी मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि आमच्या प्रोडक्शन टीमचे खूप आभार… या शोमुळे मला एक नवीन कुटुंब मिळालं. मी या सगळ्या आठवणी कायम जपून ठेवेन.”
कोमलच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मिहिकाची भूमिका साकारणाऱ्या अमृता बनेने या पोस्टवर, “तुझी खूप आठवण येईल” अशी कमेंट केली आहे. तर, “कोमल तू स्वातीची भूमिका सुंदर साकारालीस”, “आय लव्ह यू स्वाती ताई”, “स्वाती ताई तुझी आठवण येईल”, “पुन्हा नव्या मालिकेतून आमच्या भेटीला या” अशा कमेंट्स अन्य नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत स्वरदा ठिगळे, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव, इरा परवडे, अमृता बने, अनिरुद्ध हरीप हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.