‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीच्या यादीत टॉप-५मध्ये आपलं स्थान टिकवून असणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा १६ जूनला महाअंतिम भागाने शेवट होणार आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेरच्या महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे. पण या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असूनही ‘स्टार प्रवाह’ने ऑफ एअर करण्याचा घेतला आहे; ज्यावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

२ मे २०२२पासून सुरू झालेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मल्हार, मोनिका, वैदही, स्वरा, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने तर प्रेक्षकांचा चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत कधी दुसऱ्या स्थानावर, कधी तिसऱ्या स्थानावर तर कधी चौथ्या स्थानावर असायची. गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीतही ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका चौथ्या स्थानावर आहे. पण आता दोन दिवसांत मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा शेवट गोड होताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट : महासप्ताहात बहरणार प्रेमाचं नातं, सागर करणार मुक्ताला किस अन् मग…, पाहा प्रोमो

मालिकेतील मोनिकाच्या पापांचा घडा भरला असून ती आंधळी असल्याचं नाटक मल्हारसमोर उघड झालं आहे. तसंच वैदहीचा खूनही तिनं केल्याचं सत्य मल्हारसमोर आलं आहे. त्यामुळे आता मालिकेचा शेवट गोड होणार आहे. प्रेक्षक गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं तो क्षण शेवटी दाखवण्यात येणार आहे. अखेर खऱ्या बाप-लेकीची भेट महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागाच्या प्रोमोमध्ये मल्हार आणि स्वराची भेट होताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता, साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.