Star Pravah Shubhvivah Serial Off Air : विविध मराठी वाहिन्यांवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. आता या नव्या मालिका सुरू झाल्यावर काही जुन्या सिरियल्स प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. छोट्या पडद्यावर जवळपास ३ वर्षे सुरू असणारी आणि १००० एपिसोड्सचा टप्पा गाठणारी अशीच एक लोकप्रिय मालिका नुकतीच ऑफ एअर झाली आहे.
‘स्टार प्रवाह’चं दुपारचं सत्र गाजवणारी लोकप्रिय ‘शुभविवाह’ मालिका अखेर संपली आहे. ‘शुभविवाह’चा पहिला एपिसोड १६ जानेवारी २०२३ रोजी प्रसारित झाला होता. तर, या मालिकेचा अंतिम भाग ५ मार्च २०२६ रोजी प्रक्षेपित होईल.
‘शुभविवाह’ने तीन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. वेगळं कथानक, दमदार कलाकारांमुळे ही मालिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे ‘शुभविवाह’ दुपारच्या सत्रात प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेचा टीआरपी जबरदस्त होता.
मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार या त्रिकुटाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम मिळालं. या तिघांच्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. याशिवाय कुंजिकाने साकारलेली पौर्णिमा सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाली होती. कुंजिका गरोदर असल्याने काही महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. याशिवाय सिद्धेश प्रभाकर, काजल पाटील, अपूर्वा नेमळेकर असे लोकप्रिय कलाकार ‘शुभविवाह’ मालिकेत झळकले होते.
‘शुभविवाह’ मालिकेचा अंतिम भाग ५ मार्चला प्रसारित होईल. कलाकारांनी सेटवर केक कापून या मालिकेचं यश साजरं केलं आणि सर्वांचा निरोप घेतला. मात्र, ही मालिका संपल्याची माहिती समोर येताच प्रेक्षकांनी एक खंत व्यक्त केली आहे.
या मालिकेचा अंतिम प्रोमो म्हणजेच शेवट कसा होणार याची झलक दाखवणारा प्रोमो ‘स्टार प्रवाह’कडून शेअर करण्यात आला नाही असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. पण, उशिरा का होईल स्टार प्रवाहने प्रोमो शेअर करत या मालिकेचा अंतिम भाग ५ मार्चला प्रसारित होईल असं जाहीर केलं आहे.


दरम्यान, ‘शुभविवाह’ मालिकेने नुकतेच हजार भागही पूर्ण केले होते. ही मालिका सुरुवातीला दुपारी २ वाजता, त्यानंतर सप्टेंबर २०२५ पासून दुपारी अडीच वाजता आणि आता १६ फेब्रुवारी ते ५ मार्च असे काही दिवस ‘शुभविवाह’ मालिका दुपारी तीन वाजता प्रसारित केली गेली. आता ‘स्टार प्रवाह’वर आगामी काळात कोणत्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
