‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी एका जुन्या सिरियलने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका अवघ्या ८ महिन्यांपूर्वीच ऑन एअर झाली होती आणि नुकताच याचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला आहे. मालिका संपल्यावर मुख्य नायिकेने भावुक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचं नाव आहे ‘तुझ्या सोबतीने’!
‘तुझ्या सोबतीने’ मालिका जानेवारी २०२६ मध्ये म्हणजेच साधारण ८ महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, आता अवघ्या काही महिन्यांतच या सिरियलने सर्वांचा निरोप घेतला आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी, अजिंक्य ननावरे आणि माधवी निमकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मालिका संपल्यावर नुपूरची भूमिका साकारणारी अभिनेत्री एतशा संझगिरी लिहिते, “…आणि अशाप्रकारे नुपूरचा प्रवास संपला! कालचा दिवस माझ्यासाठी खूपच भावुक होता. कारण, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ या आमच्या मालिकेचा समारोप झाला. या सुंदर प्रवासाचा भाग असलेल्या माझ्या नुपूर या पात्राचा, आमच्या सेटचा आणि संपूर्ण टीमचा निरोप घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही या शूटिंगदरम्यान खूप मजा केली आणि आठवणीत राहतील असे अनेक फोटो आणि व्हिडीओ काढले. धमाल-मस्ती, सलग अनेक तास शूटिंग, सेटवरचं सेलिब्रेशन, पडद्यामागचे प्रत्येक छोटे-छोटे क्षण मी कायम मनात जपून ठेवेन.”
अभिनेत्री पुढे लिहिते, “हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल माझ्या संपूर्ण ‘तुझ्या सोबतीने’ कुटुंबाचे आभार! कॅमेऱ्यासमोर आणि पडद्यामागे अहोरात्र काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मेहनत आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. या सुंदर प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल स्टार प्रवाहचेही आभार, मी त्यांची कायम ऋणी असेन. सर्वात महत्त्वाचं म्हणते, माझ्या प्रिय प्रेक्षकांनो! तुमचेही खूप-खूप आभार. नुपूरला तुम्ही कायम तुमच्या हृदयात स्थान दिलंत. तुमचे मेसेज, कौतुक, पाठिंब्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी इतका खास आणि अर्थपूर्ण ठरला आहे.”
“प्रत्येक पात्र मागे काहीतरी सोडून जातं…नुपूरला सुद्धा कायम माझ्या हृदयात विशेष स्थान असेल. तर सध्या नुपूर तुमचा निरोप घेतेय. पण, हा निरोप कायमचा नाही बरं का! आपण सोशल मीडियावर असेच संपर्कात राहू आणि मी वचन देते की, माझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती मी लवकरच शेअर करेन! तोपर्यंत असेच माझ्या पाठिशी राहा. Nupur signing off! विथ लव्ह, तुमचीच लाडकी एतशा!” अशा भावना एतशाने व्यक्त केल्या आहेत.
