Star Pravah : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १२ ऑक्टोबरपासून ‘मराठी मिडियम’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये प्रसिद्ध रीलस्टार अभिनेत्री श्रद्धा पवार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या सरस्वतीची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता ऑन एअर होईल. सध्या या स्लॉटला ऐश्वर्या नारकरांची ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका प्रसारित केली जाते.

१२ ऑक्टोबरपासून नवीन मालिका सुरू होणार असल्याने ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका दुपारच्या सत्रात १ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

तर, सध्या वाहिनीवर दुपारी १ वाजता ‘वचन दिले तू मला’ ही मालिका प्रसारित केली जाते. ११ ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग ऑन एअर होईल आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. ‘वचन दिले तू मला’ गेल्या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाली होती. आता अवघ्या १० महिन्यांत ही अनुष्का सरकटेची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी नुकतीच भावनिक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली होती.

१२ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर काय बदल होणार?

  • नवीन मालिका मराठी मिडियम – सायंकाळी ६:३० वाजता
  • आमच्या लाडक्या नाईक बाई – दुपारी १ वाजता
  • वचन दिले तू मला – Off Air

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांची मालिका अलीकडेच दोन महिन्यांपूर्वी सुरू झालीये. त्यामुळे इतक्या लवकर मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेतल्याने आणि वचन दिले तू मला मालिका ऑफ एअर होत असल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. “आम्हाला वचन दिले तू मला ही मालिका अजून पाहायची आहे…अशी अचानक बंद नका करू”, “काय सुरूये? लगेच वेळ बदलली नाईक बाईंची” अशा असंख्य प्रतिक्रिया प्रोमोवर आल्या आहेत. आता १२ तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘मराठी मिडियम’ मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.