Star Pravah Serial Visaru Nako Tu Mala Promo : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘विसरू नको तू मला’ या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. ही लोकप्रिय मालिका येत्या २९ जूनपासून ऑन एअर होणार आहे. मात्र, जवळपास महिनाभर स्टार प्रवाहने या मालिकेच्या प्रसारणाची वेळ गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर एक नवाकोरा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहने ‘विसरू नको तू मला’ची वेळ जाहीर केली आहे.

‘विसरू नको तू मला’ ही मालिका २९ जूनपासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या स्टार प्रवाहवर सायंकाळी सात वाजता मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यंदाच्या वर्षी ही सिरियल महाराष्ट्राची महामालिका सुद्धा ठरली होती. पण, आता गेल्या काही दिवसांच्या टीआरपीच्या आधारे या मालिकेचा सात वाजताचा स्लॉट ‘विसरू नको तू मला’ मालिकेला देण्यात आला आहे.

आता ‘विसरू नको तू मला’ ही मालिका सात वाजता प्रसारित झाल्यावर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’चं काय होणार? ही मालिका संपणार की याची वेळ बदलली जाणार असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. अनेकांनी सध्याचा ट्रॅक पाहता मालिका बंद होईल असं म्हटलं आहे. तर, काही लोकांनी ही मालिका दुपारी दीड वाजताच्या स्लॉटला शिफ्ट केली जाईल असा अंदाज बांधला आहे. वाहिनीने अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाहीये. लवकरच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेबद्दलची अधिकृत अपडेट कलाकार व वाहिनीकडून जाहीर केली जाईल.

‘विसरू नको तू मला’ ही एक उत्कट प्रेमकथा आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तन्वी ‘डॉ. वैदेही’ ही भूमिका साकारणार आहे. तर, शाल्वचं ‘सूर्या’ची भूमिकाची साकारेल. सूर्या दशावतारात काम करणारा कलाकार असतो. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर खऱ्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे.

तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर, शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरीड असे अनेक लोकप्रिय कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. निर्माते आणि लेखक सचिन दरेकर यांनी मालिकेची कथा लिहिली आहे.

दरम्यान, ‘विसरू नको तू मला’ ही मालिका २९ जूनपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आता या मालिकेला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.