Star Pravah Visaru Nako Tu Mala Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २९ जूनपासून ‘विसरू नको तू मला’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची फ्रेश जोडी ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातल्या गुहागरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. नयनरम्य लोकेशन्स…नवी जोडी आणि नवी लव्हस्टोरी असा तिहेरी योग जुळून आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे.
या मालिकेत शाल्व सूर्या तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नाखवा कुटुंबातील सूर्या हा घरातल्या प्रत्येकाचा लाडका, जबाबदार आणि कष्टाळू मुलगा आहे. बाहेरून रांगडा आणि कणखर वाटणारा सूर्या मनाने मात्र अत्यंत प्रेमळ, दिलदार आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारा आहे. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाच्या व्यवसायाला भरभराट मिळाली. त्यामुळे घरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्या हस्तेच केली जाते. त्यामुळे तो केवळ कुटुंबाचा सदस्य नसून त्यांच्या आयुष्यातील लकी चार्म मानला जातो.
सूर्या या व्यक्तिरेखेविषयी सांगताना शाल्व म्हणाला, “सूर्या हा नारळासारखा आहे. जो बाहेरून स्वभावाने कडक, कणखर वाटतो पण आतून तितकाच गोड आणि मोठ्या मनाचा आहे. या भूमिकेसाठी मी गेली चार महिने माझ्या फिजिकवर मेहनत घेत आहे. योग्य आहार आणि दररोज तीन तासांचा वर्कआऊट हा माझ्या आयुष्याचा भाग झाला आहे. सुरुवातीला मी इतका शिस्तबद्ध नव्हतो, पण या भूमिकेमुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता आला. सूर्या आणि त्याची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल असा मला विश्वास आहे.”
शाल्वची मेहनत आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी भावनिक प्रेमकथा यामुळे ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. शाल्वने कोकणातील शूटिंगदरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत शाल्वच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने वजन वाढवून फिट राहण्याकडे लक्षकेंद्रीत केलं आहे.
दरम्यान, शाल्व किंजवडेकर यापूर्वी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला आहे. त्याच्या या दोन्ही मालिका यशस्वी ठरल्या आहेत. आता ‘विसरू नको तू मला’ मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
