Star Pravah Yed Lagla Premach Serial Off Air : २७ मे २०२४ रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या दोघांनी मालिकेत अनुक्रमे राया-मंजिरी या भूमिका साकारल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत या मालिकेत प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. याशिवाय अनेक लोकप्रिय कलाकारांनी ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये कॅमिओ भूमिका सुद्धा केल्या होत्या. आता जवळपास २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका संपणार आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा शेवटचा अंतिम भाग रविवारी १६ ऑगस्टला प्रसारित केला जाईल. मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी आणि स्टार प्रवाहने इन्स्टाग्रामवर अधिकृत पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
“नमस्कार, मी पूजा बिरारी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी मंजिरी. आज खरंतर वाईट वाटतंय कारण, मंजिरी म्हणून मी तुमच्याशी शेवटचं बोलतेय. या मालिकेवर तुम्ही भरपूर प्रेम केलंत यासाठी मी तुमची आभारी आहे. आज मन खरंच भरून आलंय…आमच्या मालिकेचे ७६१ भाग कधी पूर्ण झाले हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. इतका सुंदर हा प्रवास होता. ७६१ एपिसोडचा टप्पा गाठणं हे काय सोपं नाहीये. पण, आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो कारण, अर्थातच प्रेक्षकांची साथ…मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय, प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं. आता इतक्या प्रेमाची सवय तुम्ही लावलीये…तर हे प्रेम असंच कायम ठेवा. तुम्हा सर्वांचे मी खूप-खूप आभार मानते. कारण, या मालिकेला तुम्ही पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या एपिसोडपर्यंत खूप प्रेम दिलं. आता हा प्रवास शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इथून पुढेही हे प्रेम असंच राहुद्यात. थँक्यू!” अशा भावना व्यक्त करत पूजाने मंजिरीच्या भूमिकेचा निरोप घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री उशीरा ११ वाजता प्रसारित केली जात होती. पण, रात्री उशीराच्या स्लॉटला सुद्धा या सिरियलला खूप चांगला टीआरपी मिळत होता. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समजताच चाहतेही नाराज झाले आहेत.
“मंजिरी-राया आम्हाला सोडून नका जाऊ”, “खूप मिस करणार या मालिकेला आमचे राया-मंजिरी”, “माझी आवडती मालिका संपणार”, “येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा दुसरा भाग लॉन्च करा”, “या मालिकेचा अंतिम भाग पाहताना वाईट वाटणार” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आल्या आहेत.
दरम्यान, १६ ऑगस्टला अंतिम भाग प्रसारित झाल्यावर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका सर्वांचा निरोप घेईल.
