Star Pravah Marathi Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट आणले जातात. काही वेळा मालिकांमध्ये लीप येतो, बऱ्याचवेळा कथानकात अनपेक्षित वळण येतं, तर अनेकदा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री केली जाते. ‘स्टार प्रवाह’च्या अशाच एका मालिकेत आता प्रेक्षकांना एकदम हटके ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतील राया-मंजिरीची जोडी सर्वांना मनापासून आवडते. मात्र, या दोघांच्या लव्हस्टोरीत कायम अडथळे निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. रायाची खरी ओळख असते विशाल भोसले…तो मंजिरीला सोडून कायमचा दूर निघून येतो.

काही दिवसांपूर्वीच रायाची बॉस म्हणून या मालिकेत किशोरी शहाणेंची एन्ट्री झाली होती. आता या पाठोपाठ ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री येणार आहे.

मंजिरीसमोर रायाचा भयंकर भूतकाळ उलगडणार आहे. नेमकी राया-मंजिरी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि इतक्यात त्यांच्या आयुष्यात एन्ट्री होते गार्गीची! ही गार्गी रायाची ‘जबाबदारी’ असल्याचं बोललं जातंय. ‘जबाबदारी’ हा शब्द ऐकून मंजिरीला सुद्धा धक्का बसतो. यामुळेच आता मंजिरीला रायाचा संपूर्ण भूतकाळ सांगितला जाणार आहे.

याच गार्गीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ साकारणार आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मयुरीची ‘अस्मिता’ ही मालिका टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. याशिवाय मयुरी काही दिवसांपूर्वी ‘अबोली’मध्ये सुद्धा झळकली होती. आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या निमित्ताने मयुरी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, राया म्हणजेच विशाल आणि गार्गीचा भूतकाळ नेमका काय असेल? हे दोघं का वेगळे होतात, भूतकाळात असं काय घडलं होतं…ज्यामुळे राया गार्गीला आपली जबाबदारी समजतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या आगामी भागात मिळतील. १७ एप्रिलला हा विशेष भाग प्रसारित केला जाणार आहे.