‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगेची एन्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा आहे. मेघा याच विक्रांतिकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी एक कुशल रणनीतीकार आहे. तिच्या एका फोनवर निर्णय बदलतात आणि अनेकांचं भविष्य नव्यानं लिहिलं जातं.
राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, बिल्डर्स आणि उद्योगपती तिच्याशी संबंध जपण्यातच आपलं हित मानतात. विक्रांतिकाला माणसांची पारख आहे. समोरच्याला विश्वास देऊन जिंकायचं, गरज पडली तर भीती दाखवायची आणि विश्वासघात झाला तर कोणतीही दया न दाखवता त्याची किंमत वसूल करायची हा तिचा स्वभाव.
या भूमिकेविषयी सांगताना मेघा घाडगे म्हणाली, “विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. जवळपास २० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करतेय. माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतं हे पात्र आहे. सडेतोड उत्तर देणारी आणि अत्यंत करारी अशी ही भूमिका आहे. ऐकताक्षणीच मी या भूमिकेसाठी होकार दिला. विक्रांतिका प्रत्येक परिस्थितीचा विचार करून चाल खेळते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा पुढचा डाव काय असेल याची कायम उत्सुकता राहील. मला खात्री आहे विक्रांतिकाचं हे अनोखं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
विक्रांतिकाच्या येण्याने राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर साधारण २ वर्षांपूर्वी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची फ्रेश जोडी या मालिकेत राया-मंजिरीची प्रमुख भूमिका साकारत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेची वेळ बदलण्यात आली. आता सध्या रात्री ११ वाजता ही मालिका प्रसारित केली जाते. पण, रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा या सिरियलला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
तर, मेघाबद्दल सांगायचं झालं तर, मेघा घाडगेला मराठी कलाविश्वाची लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखलं जातं. तिने ‘पछाडलेला’ सिनेमात केलेली ‘रुपानं देखणी’ ही लावणी सर्वत्र आजही लोकप्रिय आहे. याशिवाय ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चालू द्या तुमचं’ या सिनेमांमध्येही तिने काम केलेलं आहे.
