‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेपाठोपाठ आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या टीमने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका आता ऑफ एअर होणार आहे. ही मालिका कोणती आहे जाणून घेऊयात…

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे साहजिकच काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतील. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेपाठोपाठ आता राया-मंजिरीची ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका लवकरच ऑफ एअर होईल.

२७ मे २०२४ रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या दोघांनी मालिकेत अनुक्रमे राया-मंजिरी या भूमिका साकारल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत या मालिकेत प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर अनेक लोकप्रिय कलाकारांचे कॅमिओ सुद्धा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता जवळपास २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका संपणार आहे.

We Are Signing Off! म्हणत या मालिकेची संपूर्ण टीम शूटिंग संपताच एकत्र आली होती. या सगळ्यांनी सेटवर केक कापून सेलिब्रेशन केलं. मालिकेची तांत्रिक बाजू सांभाळणारी टीम सुद्धा यावेळी उपस्थित होती. गेल्या काही महिन्यांपासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री उशिरा ११ वाजता प्रसारित केली जात होती. पण, रात्री उशिरा सुद्धा या सिरियलला खूप चांगला टीआरपी मिळत होता.

त्यामुळे ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समजताच चाहतेही नाराज झाले आहेत. लवकरच स्टार प्रवाहकडून ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर करण्यात येईल.

yed lagla premacha
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

दरम्यान, ‘⁠येडं लागलं प्रेमाचं’मध्ये आदेश व सुचित्रा बांदेकर यांची सून पूजा बिरारी प्रमुख भूमिका साकारत होती. तिच्यासह अभिनेता विशाल निकम या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत होता. याशिवाय नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, शंतनू मोघे आणि वैभव चव्हाण यांसारखे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत.