Subodh Bhave : यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी बाप्पाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा वेगळी अन् युनिक सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिज्ञा भावेने तिच्या घरी वृंदावनचा देखावा साकारला आहे. तर, रवी जाधव, राकेश बापट, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे. लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेच्या मुलांनी सुद्धा यंदा स्वत: बाप्पाची मूर्ती घडवली आहे. तसेच अभिनेत्याच्या घरचा यंदाचा देखावा सुद्धा खास चर्चेत आला आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सुबोधने एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

सुबोध भावेच्या मुलांनी…ज्ञान मिळवायचं असेल, एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर पुस्कांशिवाय पर्याय नाही, असा संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर लोक शस्त्रासारखा एकमेकांना जखमी करण्यासाठी करतात. ( ट्रोलिंग, नकारात्मकता पसरवणं, फेक अकाऊंट्स, समाजात तेढ निर्माण करणं ) यामुळेच यातून बाहेर पडायचं असेल तर अभ्यासाला अर्थात पुस्तकांना पर्याय नाही, असं सुबोध आणि त्याच्या मुलांनी सांगितलं आहे.

सुबोध भावे लिहितो, “गणपती बाप्पा मोरया! आज गणरायाचं आगमन झालेलं आहे, आपल्या सर्वांना तो उत्तम आयुष्य, आरोग्य, शांती, समाधान, आनंद देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. यंदा प्रथमच आमच्या बाप्पाची मूर्ती मुलांनी घडवली आहे. देखावा देखील त्यांची कल्पना.”

“समाज माध्यमांची सुरुवात लोकांनी एकत्र यावं म्हणून झाली. पण, आज त्याचा वापर शस्त्रासारखा एकमेकांना जखमी करण्यासाठी केला जातो. त्यातून बाहेर पडायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर अभ्यासाला अर्थात पुस्तकांना पर्याय नाही. ज्ञान हाच बाप्पाकडे जाण्याचा मार्गही आहे. हेच या देखाव्यात सांगण्याचा मुलांचा प्रयत्न. मंगलमूर्ती मोरया!” असं सुबोधने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सुबोध भावेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत त्याच्या दोन्ही मुलांचं भरभरून कौतुक केलं आहे. ही अतिशय वेगळी संकल्पना मांडली…तुमच्या मुलांचं कौतुक अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.