सुबोध भावे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि यामार्फत तो त्याच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यातील अपडेट शेअर करत असतो. अशातच अभिनेत्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यामधून तो चक्क परदेशातून मालिकेचं शूटिंग करत असल्याचं दिसत आहे. सुबोधने यामागचं कारणही सांगितलं आहे.

सुबोध भावे सध्या ‘झी मराठी’वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काम करत आहे. यामधील त्याच्या समर या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील तेजश्री प्रधान आणि त्याची म्हणजे समर आणि स्वानंदी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. अशातच आता अभिनेत्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तो परदेशात कुटुंबाबरोबर फिरायला गेला असला तरी कामातून काही ब्रेक मिळत नाही असं म्हटलं आहे त्यामुळे तिथूनही शूटिंग करत आहे.

सुबोध परदेशातून करतोय मालिकेचं शूटिंग

सुबोधने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो परदेशात फोनवर बोलतानाचा सीन करत असून महत्त्वाचं म्हणजे त्याची मुलंच याचं शूटिंग करत असल्याचं दिसतं. त्याचा मुलगा कान्हा सीन शूट करत आहे तर दुसरा मुलगा मल्हार वाक्य म्हणत त्याला सीन करण्यासाठी मदत करतोय असं त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमधून म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सुबोध म्हणाला, “परदेशात असतानाही वीण काही तुटत नाही. कुटुंबियांसमवेत फिरायला आलोय पण काम थांबता कामा नये. समर ची मिशी बरोबर घेऊन फिरतोय, सीन आला की जागा बघून शूट करून पाठवतोय. मदतीला माझी दोन्ही मुलं. कान्हा शूट करतोय आणि मल्हार समोरच्याची वाक्यं म्हणतोय”

यावेळी त्याने त्याची बायको आता निर्माती असल्याने ती ही परिस्थिती समजून घेत आहे असंही यामधून म्हणत पत्नी मंजिरी भावेचे आभार मानले आहेत. सुबोध भावेची पत्नी मंजिरी निर्मिती क्षेत्रात सक्रिय असून ती मराठी मालिकांची निर्मिती करते. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेक कलाकार मंडळींनीही कमेट केल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सुबोध भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या त्याच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून अलीकडेच त्याचा ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुबोध चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही माध्यमात एकत्रित काम करत असतो.