Pooja Birari & Soham Bandekar Wedding : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचा विवाहसोहळा २ डिसेंबरला थाटामाटात पार पडला. पूजा-सोहमच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. अखेर हे दोघंही साता जन्माचे सोबती झाले आहेत. पूजा-सोहमच्या लग्नातील अनेक फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लेकाच्या लग्नात आदेश व सुचित्रा बांदेकर या दोघांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. या दोघांचा डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. याशिवाय सध्या आणखी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुचित्रा बांदेकरांनी परंपरेनुसार सूनमुख पाहिलं. यावेळी त्यांनी लाडक्या सुनेला मांडीवर घेऊन समोर आरसा धरला होता. सासू-सुनेचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर वेळ झाली पाठवणीची…संपूर्ण बिरारी कुटुंब लाडकी लेक सासरी निघाल्यावर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पूजाने यावेळी खंबीर होत आपल्या आईला धीर दिला.

Award Banner

पूजा-सोहमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रतिमा म्हणजेच अभिनेत्री शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले, सुकन्या मोने, अभिजीत केळकर, सचित पाटील, सुमीत राघवन, दिपाली विचारे, अजित परब, अभिजीत श्वेतचंद्र, सानिका बनारसवाले, सुबोध भावे आणि त्याची पत्नी यांसह अनेक कलाकारमंडळींनी पूजा-सोहमच्या लग्नात उपस्थिती लावली होती.

दरम्यान, सचित पाटीलने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पूजा उखाणा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “सोहमला भरवला मी पहिला घास…छान होती भाजी; मिया बीवी राजी तो क्या करेगा काझी” पुढे सोहम म्हणतो, “शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून पूजाचं नाव घेतो सर्वांचा मान राखून”, आता दुसरा उखाणा…”माझ्या बायकोचं नाव आहे पूजा, तेरे सिवा ना मेरा कोई दुजा”

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर पूजा सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. याचबरोबर सोहम सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.