आदेश बांदेकरांचा चाहतावर्ग महाराष्ट्राच्या घराघरांत आहे. ‘होम मिनिस्टर’ या शोमुळे त्यांना सर्वत्र आदेश भावोजी ही वेगळी अन् आपुलकीची ओळख मिळाली. मात्र, काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग उद्भवला होता. दुधीचा कडू ज्युस प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती इतकी ढासळली की, थेट त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. आदेश बांदेकरांच्या पत्नी व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा प्रसंग सांगितला आहे.

सुचित्रा बांदेकर सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मी स्वामींकडे खरंतर कधीच काही मागत नाही. पण, मनात माझं नामस्मरण सुरू असतं. फक्त एकदाच मी त्यांच्याकडे मनापासून एक गोष्ट मागितली होती ती म्हणजे, जेव्हा आदेशला दुधीचा ज्युस प्यायल्यावर त्रास झाला होता…तो अनुभव आजही सांगताना मला जड जातंय. आदेश कडू दुधीचा ज्यूस प्यायला होता. मग त्याला उलट्या सुरू झाल्या…लूज मोशनचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला त्याला वाटलं…चांगलंय शरीरातून सगळं फ्लश आऊट होतंय. पण, त्यानंतर त्याची अवस्था फारच बिकट झाली. मी त्यावेळी ‘नांदा सौख्यभरे’ मालिकेच्या मीटिंगसाठी सकाळी झी मराठीच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यामुळे मला सुरुवातीला त्यातलं काहीच माहिती नव्हतं.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “सकाळी खरंतर तो ज्युस माझ्यासाठी बनवला होता. मी स्वामींची पूजा करत होते आणि आमच्याकडे मदतनीस जी मुलगी होती तिने विचारलं ताई, तुम्ही ज्युस पिणार ना, कुठला ज्युस प्याल? मी तिला सांगितलं…तुला आवडेल तो ज्युस बनव. मला आधीच उशीर झाला होता…त्यामुळे मी पटकन सगळं आवरून बाहेर आले आणि मी पाहिलं की, ग्लासभर ज्युस तिने बनवून ठेवला होता. घाई झाल्याने मी ज्युस प्यायलेच नाही आणि माझ्यानंतर आदेशने आवरलं…तो बाहेर आला आणि त्याने तो ज्युस पाहिला. यादरम्यान त्याचा फोन कॉल सुरू होता…त्याचवेळी तो ज्युस सुद्धा प्यायला. बरं, तो तिला म्हणाला सुद्धा…की ताई हा ज्युस किती कडू आहे. त्याला सुद्धा शूटिंगला जायचं होतं. पण, उलट्या वगैरे सुरू झाल्याने तो घरीच थांबला.”

“आदेश शूटिंगला जाणार होता त्यामुळे खालीच गाडीत मेकअपमन वगैरे होता. त्याने फोन करून त्याला घरी ये असं सांगितलं. मग, फॅमिली डॉक्टरांना फोन केला…आमच्या घराच्या अगदी जवळ हिरानंदानी हॉस्पिटल आहे तिथे जाणं यांना सुचलंच नाही. शेवटी माझ्या घरी जी मुलगी आहे…तिने माझ्या आईला फोन केला आणि तिला बोलावून घेतलं. तोपर्यंत डॉक्टर आले त्यांनी सांगितलं ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. ३ मिनिटांवर हॉस्पिटल होतं…पण, त्यादिवशी इतकं ट्राफिक होतं की, यांना तिथे पोहोचण्यासाठी १५ मिनिटं लागली. आदेशला अ‍ॅडमिट केल्यावर रक्ताच्या उलट्या, ब्लड मोशन सुरू झाले. शेवटी मला आईकडून हे सगळं समजलं. त्याला तेव्हा ICU मध्ये अ‍ॅडमिट केलं होतं.”

“मला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं कडू दुधीचा ज्युस फार विषारी असतो. जर हा विषारी ज्युस कोणी ग्लासभर प्यायलं तर काय होईल? आदेशच्या पूर्ण आतड्यांवर याचा परिणाम झाला होता. तेव्हा आदेशची हार्ट लाइन ओपन केली होती…आणि मला सही करायची होती. माझा हात थरथरत होता…त्यावेळी डॉक्टर म्हणत होते अजून एक उलटी झाली तर…तेव्हा मी त्यांना स्वत:हून म्हटलं…नाही! अजून एक उलटी आदेशला होणार नाही. एवढं स्वामी करूच शकतात. ती एकच गोष्ट मी स्वामींकडे मागितली. अक्षरश: स्थिती एवढी गंभीर होती ना… पण, खरंच स्वामींच्या कृपेने सगळं नीट झालं. डॉक्टरांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला.” असं सांगत सुचित्रा यांनी स्वामींचे आभार मानले आहेत.