Suhas Shirsat on Konkani Role: कलाकार त्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवण्यासाठी अनेक कष्ट घेत असतात. अनेकदा वजन वाढवण्यापासून ते कमी करण्यापर्यंत, केस कापणे, वाढवणे, त्यांच्या देहबोलीमध्ये बदल करणे, ज्या भागातील भूमिका आहेत, तेथील भाषा, बोलण्याची पद्धत, तिथली संस्कृती, चालीरीती अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आता अभिनेते सुहास शिरसाट यांनी याबद्दल सांगितले आहे.

सुहास शिरसाट यांनी आजवर मराठी मालिका, सिनेमे, काही हिंदी सिनेमांत काम केले आहे. त्यांच्या अभिनयातून त्यांनी कायमच मने जिंकली आहेत. रात्रीस खेळ चाले ही मालिका २०१६ मध्ये प्रदर्शित झाली होती. कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. या मालिकेतील आण्णा नायक असो किंवा शेवंता, दत्ता भाऊ असो किंवा पांडू मालिकेतील प्रत्येक पात्राला लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून, दत्ता या भूमिकेतून सुहास शिरसाट यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

“त्या मालिकेमुळे प्रेक्षकांचं खूप…”

सध्या सुहास शिरसाट झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे या मालिकेत काम करत आहेत. त्यांनी सुभाष परब ही भूमिका साकारली आहे. ही भूमिकासुद्धा कोकणी पार्श्वभूमी असलेली आहे. विशेष म्हणजे रात्रीस खेळ चाले या मालिकेप्रमाणेच या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र, कोकणी भूमिका उत्तमपणे साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुहास शिरसाट हे कोकणचे नाहीत; तर मराठवाड्यातील आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे.

सुहास शिरसाट यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “कोकणातील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मुंबईत आल्यानंतर १३ वर्षं मी फक्त सिनेमांमध्ये काम करत होते. अचानक रात्रीस खेळ चाले ही मालिका मिळाली. त्या मालिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. कोकणातील लोकांनाही वाटायचं की, मी कोकणातील आहे. मला ते बरेच प्रश्न विचारायचे. कुठलं गाव आहे. मी त्यांना जेव्हा सांगायचो की, मी मराठवाड्यातील आहे, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटायचे. त्यांना वाटायचं की, मराठवाड्यातील मुलगा इतकी चांगली मालवणी बोलतो. मला खूप छान वाटतं. लोक आजही मला दत्ता म्हणून ओळखतात, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.

दरम्यान, सुहास शिरसाट यांना सनई चौघडे मालिकेतील सुभाष या भूमिकेतून प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. मालिकेत सध्या विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे.