Suhas Shirsat on Diet: कलाकार अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी खूप प्रयत्न करतात. भूमिकेला अनुसरून अभिनय करण्याबरोबरच नियमितपणे व्यायाम करणे, डाएट करणे, फिट राहण्यासाठी विविध प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी कलाकार सातत्याने करत असतात.

कलाकार विविध मुलाखती, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनशैलीबद्दल वक्तव्य करत असतात. आता अभिनेते सुहास शिरसाट यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या डाएटबद्दल सांगितले आहे. तसेच, डाएटच्या बाबतीत प्रेरणास्थानी कोण आहे, याबद्दलही त्यांनी सांगितले आहे.

सुहास शिरसाट यांना बनवता येतो उत्तम स्वयंपाक

या मुलाखतीत सुहास शिरसाट यांनी त्यांना उत्तम जेवण बनवता येते, अगदी भाकरीही करता येते असा खुलासा केला. ते केव्हा जेवण बनवण्यास शिकले? यावर ते म्हणाले, “मी हॉस्टेलला होतो, त्यावेळी सतत बाहेरचं खाण व्हायचं. जेव्हा मी मुंबईत आलो त्यावेळीही सतत बाहेरचं खावं लागत असे. शूटिंगच्या तिथे किंवा हॉटेलवर जेवावं लागत असे. एक वेळ अशी आली की मला बाहेरचं खायचा कंटाळा आला. खिचडी बनवण्यापासून सुरुवात झाली. मी कधी गावी गेलो तर आई काय करतेय, याचं निरीक्षण करायचो. दिवाळीचा फराळ बनवण्यास मदत करायचो. तिथून मला आवड निर्माण झाली. खरंतर मला आधी खूप कंटाळा यायचा. त्यानंतर आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात काहीही बनवायचं असेल तर मी आई किंवा बहिणीला फोन करायचो, त्या मला पदार्थांच्या रेसिपी सांगायच्या.”

सुहास शिरसाट यांनी असेही सांगितले की, ते बाहेरच्या जेवणापेक्षा घरच्या जेवणाला प्राधान्य देतात. डाएटबद्दल ते म्हणाले, “खरंतर डाएट करायला पाहिजे. मी डाएट करणारा माणूस नव्हतो. पण, एका सिनेमासाठी मला खूप वजन कमी करायचं होतं. मी जीम वैगेरे लावली आहे. माझी बहीण आहे ती डाएटिशअन आहे. तिला माहीत होतं की मी काय खातो, किती प्रमाणात खातो. मी माझं मेडिकल चेकअप केलं आणि तिला ते रिपोर्ट्स दिले. त्यानंतर तिने जे डाएट सांगितलं होतं, ते मी केलं आणि ३ महिन्यात १३ किलो वजन कमी केलं होतं. डाएटच्या बाबतीत मी तिच्यावर विश्वास ठेवतो.”

“राज हंचनाळेकडून प्रेरणा…”

याच मुलाखतीत त्यांना विचारले की, सनई चौघडेच्या सेटवरील सहकलाकार डाएटच्या बाबतीत काही टिप्स देतात का? यावर ते म्हणाले, “डाएटच्या बाबतीत मला जय म्हणजेच अभिनेता राज हंचनाळेकडून प्रेरणा मिळाली. त्याचं डाएट पाहिल्यानंतर मलाच लाज वाटायची. हा किती डेडिकेशनने डाएट करतो असे वाटायचे. ते करतात म्हणजे आपल्यालाही उत्साह येतो. जयमुळे मी डाएटच्या बाबतीत खूप जागरूक आहे”, असे म्हणत सुहास शिरसाट यांनी राज हंचनाळेचे कौतुक केले.

दरम्यान, सुहास शिरसाट हे सनई चौघडे मालिकेत सुभाष परब या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.