Kapil Honrao on relationships on set: कपिल होनराव नुकताच ‘राजा शिवाजी’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्या सिनेमातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्याआधी तो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. या मालिकेने २०२० ते २०२४ अशी चार वर्षांत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर तो जय जय शनिदेव या मालिकेतही दिसला होता.
कपिल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. विविध पोस्ट, फोटो तो शेअर करतो, या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…
“त्यातून बाहेर पडायला वेळ…”
कपिलने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, तू साडे तीन वर्षे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम केलंस. जेव्हा साडे तीन वर्षे आपण एखाद्या मालिकेत काम करतो किंवा सिनेमाच्या निमित्ताने आपण दीर्घकाळ एकत्र असतो तेव्हा एक कुटुंब तयार होतं, मैत्री होते. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा चार मित्र वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, एखाद्याला दुसरीकडे नोकरी बघायची असेल तेव्हा ते त्यांना सांगतात. तुझ्याबाबतीत असं झालं नाही की तुझ्या मालिकेतील कलाकारांनी तुला कामाबद्दल किंवा ऑडीशनबद्दल तुला सांगितलं नाही का? त्यावर कपिल म्हणाला, “सिरिअलच्या सेटवर तयार झालेली नाती इतकी तकलादू असतात ना, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही पाहिजे. माझी पहिला मालिका होती, दादा, भाऊ, बहीण, अशी नाती तयार झाली होती, तर मी त्या नात्यांमध्ये इतका गुरफटलो होतो की त्यातून बाहेर पडायला वेळ लागला.
पुढे अभिनेता म्हणाला, “अमुक दिग्दर्शकाला भेट किंवा त्यांच्याबरोबर काम कर असं कोणीही सांगत नाही. सगळे स्पर्धक असतात. उलट, मी काही लोकांना आता मालिकांमध्ये जे प्रमुख भूमिकांत आहेत, त्यांना मी बोलवून सांगायचो की आमच्या सेटवर ऑडिशन चालू आहेत, तुम्ही ऑडिशन द्या असं सांगायचो. पण, मला असं कोणत्याच अभिनेत्याने सांगितलं नाही की मी या प्रोडक्शनला काम करतोय आणि त्यांची नवीन मालिका येणार आहे आणि तू ऑडिशनसाठी ये. त्यामुळे मालिकेत काम करत असताना त्या दरम्यान निर्माण झालेल्या नात्यांपासून मी कानाला खडा लावला आहे. त्याच्यापासून आता चार नाही तर मी शंभर हात लांब राहतो. पुढे आता मी जेव्हा कोणत्याही सेटवर काम करेन, तेव्हा प्रोफेशनल नाती असतील. म्हणजे हसू, बोलू, ओळख असेल, सगळ्यांमध्ये मिसळू, पण ती नाती कधीच तुमचा भाऊ, बहीण किंवा जीवाभावाची मैत्रीण अशी असू शकत नाही. जोपर्यंत मालिका सुरू आहे, तोपर्यंत ती नाती असतात. मालिका संपल्यानंतर कोणी ओळख दाखवत नाही. भेटलो तर भेटलो नाहीतर नाही. कधी संपर्कातही नसतो.”
तू जोडलेल्या नात्यांचं काय झालं? यावर अभिनेता म्हणाला की माझ्याकडूनही काही चुका झाल्या. पण, मित्र म्हटल्यानंतर भांडणं होतात, मतभेद असतात, वादविवाद होतात. ते वाद कुठपर्यंत धरून ठेवायचे हे आपल्या हातात असतं. ते डोक्यात धरून ठेवलं तर नाती पुढे जाणार नाहीत. मालिकेतील खूप लोकांबरोबर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला.
“इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी मित्र नाही”
पुढे अभिनेता असेही म्हणाला की माफी मागून झाल्यानंतरही समोरचा व्यक्ती मित्रांमध्ये मला मोजत नसेल किंवा मला दिसत असेल की ते मागेच अडकले आहेत. तर मी गोष्टी सोडून देतो आणि पुढे निघून जातो. मला विचारशील तर इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी मित्र नाही, कोणी मैत्रीण नाही. एक गोष्ट मात्र आहे की सगळ्यांना मी चांगलं ओळखतो, तेही मला ओळखतात. जे काही मित्र आहेत ते अभिनय क्षेत्रातील बाहेरचे आहेत किंवा अभिनयातील आहेत ते वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, ते माझे जवळचे मित्र आहेत. काही अभिनयातीलही मित्र आहेत, त्यांना मी ऑडिशनबद्दल सांगतो, असे म्हणत कपिलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
