छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेची कथा २५ वर्षे पुढे ढकलण्यात आली आहे. मालिकेच्या नव्या कथेत जयदीप-गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेत काही नव्या पात्रांचा समावेश झाला आहे; तर काही जुन्या पात्रांची एक्झिट झाली आहे. मल्हार नावाच्या पात्राचीही या मालिकेतून एक्झिट झाली आहे. ‘मल्हार’ पात्र साकारणारा अभिनेता कपिल होनरावनं या मालिकेतील प्रवासाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.




कपिल होनरावनं त्याच्या इन्स्टाग्रामवर मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करीत त्यानं लिहिलं, “९०० प्लसच्या वर एपिसोड, साडेतीन वर्षांचा प्रवास काल थांबला. सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेनं जे सुख मला दिलंय, ते मी शब्दांत मांडू शकणार नाही. नाव, ओळख, प्रसिद्धी, यश सगळं सगळं या एका मल्हारनं कपिलला दिलंय. मल्हार असा इतका साधा माणूस असतो हेच सुरुवातीला मला पटत नसे. पण, हळूहळू त्याचा समजूतदारपणा, त्याचा साधेपणा, सगळं या कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं. कमी बोलणं हे नंतर स्क्रीनवर करता करता आवडू लागलं. मल्हार जरी आता नसला तरी त्याचे हे सगळे चांगले गुण कायम आता माझ्यासोबत असतील.”
कपिलनं पुढे लिहिलं “तुम्ही प्रेक्षकांनी मला जे भरभरून प्रेम दिलंय त्याचा मी कायमचा ऋणी असेल. तुमचे लाख लाख आभार! असंच तुमचं प्रेम कायम असू द्या. मला ही संधी दिली त्याबद्दल ‘स्टार प्रवाह’चे खूप आभार. ‘कोठारे व्हिजन’चेही खूप आभार. भेटू लवकरच नवीन रूपात नवीन वेशात. सर्वांचा खूप आभारी आहे.”
मल्हारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर रात्री ९.३० वाजता प्रसारित होत होती. आजपासून (२० नोव्हेंबर) ती रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.